फेकरीतील अतिक्रमणाचा विषय पेटला : वंचित बहुजन आघाडीने गटविकास अधिकार्यांसमोर जाळली नोटीस
The issue of encroachment in Fekari has escalated: the Vanchit Bahujan Aghadi burned the notice in front of the Block Development Officer भुसावळ (4 फेब्रुवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्या नेतृत्वात भुसावळ पंचायत समितीत धडक देत गटविकास अधिकार्यांसमोर ग्रामपंचायतने बजावलेल्या अतिक्रमणाच्या नोटीस जाळून प्रचंड संताप व्यक्त केला.
काय घडले शहरात ?
गेल्या 30 ते 40 वर्षापासून फेकरी गावात सर्वे नंबर दोन मध्ये शेकडो घरे वास्तव्यास आहेत. सर्वधर्मीय समाज बांधवांचा यात समावेश आहे. फेकरी ग्रामपंचायतीने या रहिवाशांना 2020 मध्ये नमुना 8/12 च्या भोगवटा उतार्यांचे देखील वाटप केले होते. असे असतांनादेखील सरपंच व ग्रामसेवक संगणमत करून स्थानिक रहिवाशांना अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली गेल्या तीन वर्षापासून अतिक्रमण काढावे यासाठी वारंवार नोटीस देत आहेत. यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कारवाई सरपंच यांच्याकडून राजकीय द्वेषातून करत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.

घरकुल नियमानुकूल करण्याची मागणी
ही कारवाई त्वरित थांबवून स्थानिक रहिवाशांना तातडीने नियमानुकूल करून कायम करा. अशी मागणी करत संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट गटविकास अधिकारी, सरपंच यांच्या समोर अतिक्रमणाच्या नोटीस जाळून ग्रामपंचायतीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत या कारवाईला विरोध केला.
कुणावरही अन्याय होणार नाही : गटविकास अधिकारी
गटविकास अधिकारी यांनी ग्रामस्थ समोर भूमिका मांडताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, रुपेश साळुंके, संगीत खरे, प्रवीण आखाडे, बबन कांबळे, मिका गायकवाड यांच्यासह शेकडो ग्रामस्थ्य उपस्थित होते.







