संतापजनक : सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीन सापडली ढाब्यावर !

आता याला कारणे काय देणार? अंबादास दानवेंचा निवडणूक आयोगाला सवाल


Outrageous: An EVM machine was found at a roadside restaurant in Solapur! सोलापूर (8 फेब्रुवारी 2026) : राज्यात होणार्‍या निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्या वापरावर विरोधक वारंवार शंका उपस्थित करतात मात्र आता शनिवारी राज्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत ईव्हीएमच्या वापरानंतर एक ईव्हीएम चक्क ढाब्यावर आढळल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे. हे खरोखरचच धक्कादायक असल्याचे दानवे यांनी म्हटले तसेच अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले दानवे ?
अंबादास दानवे म्हणाले, ईव्हीएम मशीनला नेण्यासाठी एसटी असते किंवा एखादे वाहन नेमण्यात आलेले असते. ईव्हीएम मशीन ढाब्यावर सापडले आता याला कारणे काय देणार? ईव्हीएम वारंवार शंका उपस्थित होत आहे. तसेच यात निवडणूक आयोग काही तरी करून सत्ताधारी पक्षाला मदत करत असते, असा गंभीर आरोप दानवे यांनी लगावला आहे.

लहान मुले धरतात हट्ट
पैठण येथे देखील एक प्रकार घडला ज्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते विलास भूमरे यांनी त्यांच्या छोट्या मुलाला मतदान कक्षापर्यंत नेले. यावरून दिवसभर टीका टिप्पणी झाली. यावर अंबादास दानवे यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, लहान मूल आहे ते. यावर टीका टिप्पणी करणे योग्य होणार नाही. लहान मुलं कधी कधी हट्ट धरतात, बाबा मला घेऊन चला, मला शाई लावा, तशा अँगलने नेले असेल, असे मला वाटते तसेच ही जबाबदारी निवडणूक अधिकार्‍यांची आहे. विलास भूमरे यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही. निवडणूक कर्मचार्‍यांचीच चूक आहे.

संघाचे कार्यकर्ते ठराविक पक्षाचा प्रचार करतात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणाले होते की संघाचे सेवक राजकारण करत आहेत. परंतु, संघ हा काही राजकीय पक्ष नाही. यावर आपले मत मांडताना अंबादास दानवे म्हणाले, हे सत्य आहे की संघ हा राजकीय पक्ष नाही पण संघाचे सेवक राजकीय पक्षाचा प्रचार करतात, हे अतिशय खरे आहे. संघाच्या शाखेवर कोणत्या पक्षाला मतदान करायचे हे सांगितले जाते. यात नाकारण्यासारखे काही नाही. सलमान खान संघाच्या कार्यक्रमाला गेला यात काही विशेष असे काही नाही. सलमान हा देशाचा नागरिक आहे. कसे आहे, त्यांनी एखाद्या मुसलमानाला बोलावले की तो राष्ट्रवाद होतो आणि दुसर्‍या कोणी बोलावले तर धर्मवाद होतो.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !