राज्यात भाजपच नंबर वन : जनतेचा महायुतीवर विश्वास ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
BJP is number one in the state: The public has faith in the Mahayuti (grand alliance); Chief Minister Devendra Fadnavis मुंबई (9 फेब्रुवारी 2026) : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि अंतिम टप्प्यातले कल पाहता महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला आहे. 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थापित झाला आहे. या सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येणार असल्याचे स्पष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
60 ठिकाणी भाजप नंबर एकवर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, साधारण आपण बघितले तर जवळपास 60 ठिकाणी भाजप नंबर एकवर आहे. छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा. शिवसेना दोन ठिकाणी नंबर एकवर आहे, रत्नागिरी आणि रायगड. राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात नंबर एकवर आहे. जिथे तीनही पक्ष एकत्रित लढलो अशा कोल्हापूर आणि लातूरमध्ये देखील आम्हीच नंबर एकवर आहोत. त्यामुळे मला असे वाटते की अतिशय चांगला हा कल समोर आलेला आहे. भाजपसाठी देखील आपला 2017 चा रेकॉर्ड तोडला आहे. 2017 साली भाजपला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 141 जागा होत्या. आता अजून निकाल पूर्ण व्हायचे आहेत, पण घोषित झालेल्या निकालात 236 जागा भाजपला मिळाल्या आहेत.
मित्र पक्षांनी मिळवले यश
मुख्यमंत्री म्हणाले की, आपण जर पंचायत समितीचा विचार केला, आत्तापर्यंत घोषित जागा ज्या झालेल्या आहेत त्यात 2017 साली भाजपला एकूण 284 जागा होत्या, आताचा जो कल आहे त्यात 410 जागा भाजपला मिळाल्या आहेत. तसेच आमच्या मित्रांना सुद्धा चांगल्या जागा मिळाल्या आहेत. 125 पैकी साधारणपणे 50 पंचायत समिती भाजपकडे असतील, 26 शिवसेनेकडे असतील, 23 राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील. त्यानंतर 7-8 काँग्रेसकडे, 7-8 शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आणि उबाठाकडे 5 अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे इथे देखील महायुतीला 125 पैकी शंभरच्या वर पंचायत समिती जिंकता आल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शरद पवार लवकरच बरे होतील
शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला पण ही माहिती माध्यमातूनच समजली. गेली काही दिवस जो स्ट्रेस होता त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असेल. पण मला विश्वास आहे की त्यांची तब्येत ठीक होईल आणि आमच्या सर्वांच्या प्रार्थनाही त्यांच्यासोबत आहेत आणि शुभेच्छाही त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे ते अतिशय नीट बरे होतील.
