भुसावळातील भोळे महाविद्यालयात छत्रपती शिवरायांना अभिवादन
भुसावळ (19 फेब्रुवारी 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग संयुक्त विद्यमाने गुरुवार, 19 रोजी सकाळी शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आल. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.डी.एस.राणे, प्रकाश सावळे उपस्थित होते.

राजे कुशल प्रशासक
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर दूरदृष्टी असलेले सुजाण प्रशासक होते. त्यांनी शिक्षणाला राज्यकारभाराचा महत्त्वाचा भाग मानले. त्या काळात औपचारिक शाळा-महाविद्यालयांची रचना मर्यादित असली तरी ज्ञान, संस्कार आणि प्रशासनिक प्रशिक्षण यांना त्यांनी विशेष प्रोत्साहन दिले. महाराजांनी गुरुकुल, वेदपाठ शाळा, मठ आणि मंदिरांमार्फत चालणार्या शिक्षण संस्थांना जमीनजुमला व आर्थिक मदत दिली. यामुळे संस्कृत, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र आणि साहित्य यांचा अभ्यास वृद्धिंगत झाला. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर वाढवून त्यांनी स्थानिक लोकांना प्रशासन समजण्यास सुलभ केले. यामुळे व्यवहारज्ञान आणि लोकशिक्षणाला चालना मिळाली.
अष्टप्रधान मंडळ आणि इतर अधिकारी वर्गासाठी योग्य शिक्षण व प्रशिक्षणाची व्यवस्था केली. सुशिक्षित, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी घडवणे हे त्यांचे धोरण असल्याचे प्राचार्य फालक म्हणाले.
शिक्षणदृष्टी आजही प्रेरणादायी
मावळ्यांना शस्त्रविद्या, गनिमी कावा, किल्ले व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले. शिस्त, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा हे शिक्षणाचे प्रमुख घटक होते. स्त्रियांचा सन्मान राखणे आणि नैतिक मूल्यांचे जतन करणे हा त्यांच्या शिक्षणदृष्टिकोनाचा भाग होता. समाजात चारित्र्य, कर्तव्य आणि नीतिमत्ता रुजवणे हे त्यांचे ध्येय होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षणाला केवळ पुस्तकी ज्ञान मानले नाही, तर संस्कार, शिस्त, राष्ट्रप्रेम आणि प्रशासनिक कौशल्य यांचा संगम मानला. त्यांची शिक्षणदृष्टी आजही प्रेरणादायी असल्याचे प्राचार्य म्हणाले.







