कॅप्टन अशोक खरातच्या कृष्णकृत्यांचा छडा लावण्यासाठी एसआयटीची घोषणा


SIT Announced to Uncover Captain Ashok Kharat’s Misdeeds नाशिक (19 मार्च 2026) : पतीच्या मृत्यूची भीती घालत विवाहितेवर अत्याचार करणार्‍या स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ ’कॅप्टन’ अशोक खरातला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या अनेक कारनाम्यांची चर्चा सुरू झाली आहे. आरोपी खरातच्या कृष्णकृत्यांचा छडा लावण्यासाठी राज्य सरकारने आता विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली असून या पथकाच्या प्रमुखपदी तडफदार महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे आता खरातच्या राजकीय आणि धार्मिक संबंधांसह शोषणाच्या रॅकेटचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे.

एसआयटीद्वारे होणार तपास
गृह विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, अशोक खरात याच्याविरुद्ध नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर (शिर्डी) येथे नोंदवलेल्या तीन स्वतंत्र गुन्ह्यांचा तपास आता ’एसआयटी’मार्फत एकत्रितपणे केला जाईल. महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाने या प्रकरणातील सर्व केस डायरी, पुरावे आणि जप्त केलेले साहित्य तातडीने या विशेष पथकाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.



खरातवर तीन पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल
अशोक खरात याच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा आरोपाचा गुन्हा दाखल आहे. नाशिक ग्रामीणच्या वावी पोलिस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिस ठाण्यात पीडितेचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोपाचा गुन्हा दाखल आहे.

58 व्हिडिओंचे रहस्य उलगडणार?
अशोक खरातच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमधील 58 आक्षेपार्ह व्हिडिओ हे या तपासातील सर्वात महत्त्वाचे दुवे मानले जात आहेत. तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील पथक आता या व्हिडिओंमधील महिलांची ओळख, यामागे असलेले मोठे रॅकेट, राजकीय-धार्मिक संबंध आणि खरातच्या मालकीच्या ’श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट’मधील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करणार आहे.

धार्मिक बुरख्याआड शोषणाचे साम्राज्य
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालेला अधिकारी आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याने ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि ’अंकशास्त्रज्ञ’ म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती. याच प्रतिमेचा वापर करून त्याने अनेक महिलांना जाळ्यात ओढल्याचा संशय आहे. सध्या अशोक खरात 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत आहे.

…तर रुपाली चाकणकर पुरावे नष्ट करतील
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी खळबळजनक आरोप केले असून महिल्या आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या पुरावे नष्ट करतील त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !