शालार्थ आयडी, हजारो कोटींचा घोटाळा ; शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल
Shalarth ID: A Scam Worth Thousands of Crores : Education Expert P.H. Dalal भुसावळ (28 मार्च 2026) : सध्या आपल्या राज्यात शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे विविध बातम्यांवरून स्पष्ट होत आहे. खरे म्हणजे ही लक्षण आधीच लक्षात येत होती! सत्य सांगायचे तर माहीत असूनही त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्यानेच ह्या वाळवी ने शिक्षणक्षेत्र पुरते पोखरून टाकले आहे. शाळेतील पट संख्या वाढवून दाखविण्यासाठी काही भ्रष्ट शिक्षणसंस्था चालकांनी त्यासाठी अनेक उपद्व्याप केले. पट वाढला की शिक्षक धावत येतो त्यातून लाखो रुपये मिळतात, शिवाय पोषण आहाराच्या माध्यमातून स्वतःचे पोषणही परस्पर करता येते. त्यासाठी शिक्षण खात्यातील काही अधिकारीही आपल्या टोळीत सामावून घेतले जात! आपण दोघे भाऊ, दोघे मिळून खाऊ! हळू हळू ह्या वर्तुळाचा परीघ वाढत जातो आणि मग कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे चहूकडे! अशी स्थिती व्हायला वेळ लागत नाही.
पटसंख्येद्वारे पडताळणी आवश्यक
या संदर्भात आणखी एक मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे, ते असा की, दर वर्षी ऑगस्टअखेर जिल्ह्यातील सर्व शाळांना शिक्षण विभागातील विविध अधिकार्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन, विद्यार्थ्यांची डोके मोजून पट संख्या पडताळून पाहणे आवश्यक आहे त्यानुसार कर्मचारी सूची मंजूर करण्यात येते. या अधिकार्यांना सत्यस्थित माहिती नाही असे कसे म्हणता येईल? किंबहुना त्यांच्याच अर्थपूर्ण मूक संमतीनेच खोटे पट खेळले जातात.

राज्यस्तरीय शालार्थ आयडी घोटाळ्यात करोडोंचा भ्रष्टाचार बाहेर येत आहे पण ह्यात ज्यांचा काडीचाही सहभाग नाही अशा लाखो प्रामाणिक, सरळमार्गी शिक्षकांची, संस्था चालकांची बदनामी होत आहे, ती बाब अतिशय चिंताजनक आहे. प्रसार माध्यमांच्या प्रचार पद्धतीमुळे सर्वच शिक्षक व शिक्षण क्षेत्राबद्दल समाजात आणि विशेषतः विद्यार्थी वर्गात निंदनीय प्रतिमा निर्माण होत आहे. या पवित्र क्षेत्राचे प्रचंड अवमूल्यन होत आहे. मजा कोणाची, सजा कोणाला? असा हा प्रकार आहे.
शिक्षण क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार आहे ह्याबाबत दुमत नाहीच पण असे भ्रष्टाचारी व त्यांचे साथीदार यांना खड्यासारखे वेचून वेचून काढले पाहिजे मात्र असंख्य निरपराध शिक्षकांची प्रतिमा किंचितही डागलता काम नये आणि शिक्षकांनीही काही झाले तरी मी, खोटी हजेरी ,खोटे काम करणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करून तिचे पालन केले पाहिजे तरच खर्या अर्थाने भावी नागरिकांवर मूल्यसंस्कार होतील.
आचार्य देवो भव सुद्धा तेव्हाच सार्थ होईल. हे व्रत कठीण आहे,पण अशक्य नाही, व नीतिमान भावी नागरिक घडविण्याला त्याशिवाय पर्याय नाही! हे असीधरा व्रत ज्याला पेलवणार नाही, त्यांनी स्वतःहून शिक्षण क्षेत्राला रामराम ठोकून अन्य क्षेत्रात जायला हवे ! भ्रष्टाचाराच्या रोगावर असे लसीकरण हाच खरा प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे भुसावळचे शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी कळवले आहे.




