जळगावातील अनुभूती बाल निकेतनमध्ये आषाढीनिमित्त पालखी, दिंडीसह सांस्कृतिक कार्यक्रम
जळगाव (शनिवार, 25 जुलै 2026) : आषाढी एकादशीनिमित्त अनुभूती बाल निकेतनमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती आणि संस्कारांचा संगम घडविणारा पालखी सोहळा उत्साहात झाला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, बहिणाई, जनाबाई, मुक्ताबाई यांसारख्या संतांच्या वेशभूषेत असलेल्या चिमुकल्यांनी शाळेच्या परिसरात दिंडी काढून जय हरी विठ्ठलच्या जयघोषात गोल रिंगण केले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची प्रत पालखीत ठेवून मिरवणूक काढण्यात आली होती. या सोहळ्यास ब्राझीलचे पाहुणे मॅथियास चॅव्हेस जेगर उपस्थित होते.
विठ्ठलाच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठलाच्या आरतीने झाली. विद्यार्थ्यांनी देह विठ्ठल विठ्ठल झाला, माऊली देह झाला विठ्ठल, दिंडी चाले यांसारख्या भक्तिगीतांवर नृत्य सादर केले. भक्त पुंडलिक या कथानकावर आधारित नाटिकेतून आई-वडिलांप्रती सेवा, प्रेम आणि भक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. अवन्या पवार व गौरी यांनी अभंग म्हटले व मराठीतून आषाढी एकादशीचे महत्त्व सांगणारे भाषण केले. त्याच प्रमाणे राजवीर लोढाया आणि निराम लाठी यांनी इंग्रजीतून भाषण केले. प्रेम, भक्ती, दयाळूपणा आणि देवावरील श्रद्धेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शिक्षिका वर्षा मोहिते यांनी वारकरी परंपरा, संत ज्ञानेश्वर महाराजांचे कार्य आणि पायी पंढरपूर वारीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी अनुभूती बालनिकेतन आणि अनुभूती विद्यानिकेतनच्या बाल वारकर्यांनी उभी पंढरी या गीतावर नृत्य सादर करून सामूहिकरित्या विठ्ठल… विठ्ठल…चा गजर करत भक्तिमय वातावरण निर्माण केले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली. शेवटी गुळ-शेंगदाण्याचा लाडू प्रसाद वाटण्यात आला. अवनी जैन यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.



