जागतिक आरोग्य दिनानिमित्त खर्ची बुद्रुक येथे आरोग्य जनजागृती उपक्रम


खर्ची बु.॥, ता.एरंडोल (8 एप्रिल 2026) : गांधी रिसर्च फौंडेशन, जळगाव व समाजकार्य विभाग क.ब.चौ.उ.म.विद्यापीठ यांच्या वतीने खर्ची बू येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून गावात भव्य आरोग्य जनजागृती फेरी काढण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे व निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचवणे हा होता.

फेरीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वच्छ गाव – निरोगी गाव, व्यसनमुक्तीचाच खरा मार्ग, संतुलित आहार – निरोगी जीवनाचा आधार, दररोज व्यायाम करा, आजारांना दूर ठेवा शौचालय असेल ज्याच्या घरी – आरोग्य नांदेल त्याच्या दारी अशा घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून सोडले. हातात फलक घेऊन विद्यार्थ्यांनी स्वच्छता, आरोग्य, व्यसनमुक्ती, तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य याबाबत प्रभावी संदेश दिले. गावातील विविध भागातून ही फेरी फिरत असताना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


फेरीनंतर शाळेच्या प्रांगणात मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात समाजकार्य विभाग, विद्यापीठाचे प्रा. योगेश माळी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून देत, नियमित व्यायाम, योगाभ्यास आणि मैदानी खेळ यांचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचे आवाहन केले. त्यांनी मोबाईलच्या अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम सांगत खेळांच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती राखण्यावर भर दिला.

यानंतर गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रशांत सुर्यवंशी यांनी दुकानात सहज उपलब्ध होणारे द्रव्य पदार्थ सेवन (तंबाखू, गुटखा, दारू इ.) यामुळे होणारे घातक परिणाम स्पष्ट करून विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व सांगताना स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नघटकांचा योग्य वापर करण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित ग्रामस्थांना स्वच्छता पाळू, व्यसनमुक्त राहू, नियमित व्यायाम करू आणि निरोगी जीवन जगू अशी आरोग्य शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अनिल माळी, प्रा. योगेश माळी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका सौ.सुनिता माळी, आशा वर्कर संगीता सोनवणे, अनिता गवळे, कृषी सखी ललीता माळी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गांधी रिसर्च फौंडेशनचे स्वयंसेवक, समाजकार्य विभाग, क.ब.चौ.उ.म.वी गजानन बोरसे, तसेच शाळा प्रशासनाचे विशेष योगदान राहिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैली स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !