रावेर भूमी अभिलेख कार्यालयातील दोन भूकरमापक निलंबित
नागरिकांना फिरवून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ; कारवाईनंतर नागरिकांकडून पेढे वाटून आनंद व्यक्त
रावेर (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : रावेर शहरातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील दोन भूकरमापकांवर नागरिकांची कामे प्रलंबित ठेवून त्यांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारायला लावणे आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत उपसंचालक, भूमी अभिलेख, नाशिक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. अमोल उत्तमराव पालवे आणि धनराज अशोक लहरिया अशी निलंबित करण्यात आलेल्या दोन्ही भूकरमापकांची नावे आहेत. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयात एकच खळबळ उडाली.
काय आहे प्रकरण ?
रावेर भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजाबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत होत्या. संबंधित भूकरमापकांकडून नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार कार्यालयात बोलावले जात असल्याची तसेच कामकाजात दिरंगाई होत असल्याची तक्रार आमदार अमोल जावळे यांच्याकडे करण्यात आली होती. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी या प्रकरणाची तक्रार उपसंचालक, भूमी अभिलेख, नाशिक यांच्याकडे केली. तक्रारीची दखल घेत संबंधित विभागाने प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर अमोल पालवे आणि धनराज लहरिया या दोन्ही भूकरमापकांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली.
नागरिकांनी वाटले पेढे
दरम्यान, दोन्ही भूकरमापकांच्या निलंबनाची माहिती रावेर शहरात पसरताच नागरिकांमध्ये या कारवाईची चर्चा सुरू झाली. काही नागरिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित अधिकार्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार अमोल जावळे यांचे नागरिकांनी आभार मानले. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत आणि नियमानुसार व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
