भुसावळात हिस्ट्रीशीटरांची तपासणी ; मिशन ऑल आऊटमध्ये 106 वाहनधारकांवर कारवाई
Inspection of History-Sheeters in Bhusawal ; Action Taken Against 106 Motorists During ‘Mission All Out’ भुसावळ (11 एप्रिल 2026) : शहरासह विभागातील गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी मिशन ऑल आऊट राबवत 106 वाहनधारकांवर कारवाई केली तसेच हिस्ट्रीशीटरांची तपासणी केली व उघड्यावर मद्य प्राशन करणार्यांवर कारवाई केली.
कारवाईने उडाली खळबळ
भुसावळचे डीवायएसपी केदार बारबोले यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा, नाहाटा चौफुली आणि दीपनगर यांसारख्या संवेदनशील नाक्यांवर केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. या मोहिमेत 106 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून तब्बल 71 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

418 वाहनांची पोलिसांकडून तपासणी
गुरुवारी संध्याकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत पोलिसांनी शहराचे सर्व प्रवेशद्वारांवर पोलिस थांबले होते. गांधी पुतळा आणि नाहाटा चौफुली या प्रमुख ठिकाणी एकूण 418 वाहनांची तपासणी केली. संशयास्पद वाहनांच्या डिकीची आणि कागदपत्रांची तपासणी केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले होते. गांधी पुतळ्याजवळ शहर निरीक्षक उध्दव डमाळे यांनी स्वत: थांबत वाहनांवर कारवाई केली. यावेळी शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांसह वाहतूक शाखेचे कर्मचारी सुध्दा तैनात केले होते.
कारवाई डीवायएसपी केदार बारबोले, पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांसह उपविभागातील सर्व सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचार्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. पोलिसांनी या मोहिमेत केवळ नाकाबंदी न करता ‘हिस्ट्री शीटर’ (रेकॉर्डवरील गुन्हेगार) आणि हद्दपार करण्यात आलेल्या 10 संशयितांची प्रत्यक्ष घरी जाऊन तपासणी केली. तसेच शहरांमधील 32 हॉटेल्स आणि लॉजची तपासणी करून अनधिकृत वास्तव्याबाबत माहिती घेतली.
कायदा मोडणार्यांची गय नाही
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आले. नियम मोडणार्यांची गय केली जाणार नाही. हद्दपार व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक तयार केल्याचे डीवायएसपी केदार बारबोले म्हणाले.






