रावेर तालुका हादरला : शरीरसुखाला नकार देणार्या गरोदर महिलेचा पतीकडून खून
Raver Taluka Shaken : Pregnant Woman Murdered by Husband for Refusing Sexual Relations रावेर (13 एप्रिल 2026) : रावेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नराधम पतीने पत्नीने शरीर सुखाला नकार दिल्यानतर तिचा गळा आवळून खून केल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. लालू शरद पावरा (25, रा.निमड्या, ता.रावेर) असे खून झालेल्या विवाहितेचे तर शरद मिरलाल पावरा (निमड्या, ता.रावेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
संबंधाला नकार : संतप्त पतीने गळाच आवळला
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आरोपी पती शरद मिरलाल पावरा याने राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जंगलात पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केली मात्र पत्नी लालू पावरा ही आठ महिन्यांची गर्भवती असल्याने तिने त्रासामुळे पतीला नकार दिला. या नकाराचा राग आल्याने शरद पावरा याने तिला जमिनीवर पाडून तिचे हात-पाय दाबले आणि छातीवर बसून दोन्ही हातांनी गळा आवळून तिची हत्या केली.

खून करून आरोपी पसार
एवढेच नव्हे तर, तिने अंगात घातलेल्या शर्टच्या साहाय्याने तिचा गळा आवळून तो शर्ट झाडाला बांधून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलीस पाटील रमजान अहमद तडवी (वय 37, रा. अंधारमळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधिकार्यांची धाव
खुनानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सोमवार, 13 एप्रिल रोजी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनीही भेट दिली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रावेर पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत आरोपी पती शरद मिरलाल पावरा याला सोमवार, 13 एप्रिल रोजी मध्यरात्री अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहेत.









