जळगावात सिमेंटचे बांधकाम धसले : पाचव्या मजल्यावरून कोसळल्याने मजुराचा जागीच मृत्यू


Cement Structure Collapses in Jalgaon : Laborer Dies on the Spot After Falling from Fifth Floor जळगाव (14 एप्रिल 2026) : सिमेंट भरताना बांधकाम धसल्याने पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्यामुळे 32 वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला. मुकेश गोकुळ सोनार (रा.तानाजी मालुसरे नगर, असोदा रोड जळगाव) असे मृताचे नाव आहे. ही दुर्घटना शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील शेरा चौकात घडली.

काय घडले जळगावात ?
मास्टर कॉलनीतील शेरा चौकात साबीर शेख यांच्या मालकीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवार, 13 एप्रिल रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास ठेकेदार सुरेश मिस्तरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश सोनार हे विशाल चव्हाण आणि सुनील सपकाळे या इतर दोन मजूरांसोबत पाचव्या मजल्यावरील लिंटल माळाचे काम करत होते.


त्या ठिकाणी सिमेंट भरत असताना अचानक बांधकाम धसले आणि मुकेश यांचा तोल गेल्याने ते थेट पाचव्या मजल्यावरून खाली कोसळले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला आणि चेहर्‍याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर घटनास्थळी प्राथमिक पाहणी केली असता, इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी सुरक्षा जाळी किंवा इतर कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेली नसल्याचे दिसून आले आहे. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे एका निष्पाप मजुराचा बळी गेल्याची चर्चा आहे.

मयत मुकेश सोनार हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. घराचा कर्ता पुरुष गेल्याने सोनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !