जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई : गावठी कट्टा, कोयता बाळगणारे संशयीत जाळ्यात
Jalgaon MIDC Police Action: Suspects Possessing Country-made Pistol and Sickle Nabbed जळगाव (15 एप्रिल 2026) : दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा आणि धारदार कोयता बाळगणार्या दोन तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. रोहित गोपाळ कुंवर (22, रा.कासमवाडी) व सागर रामा सोनवणे (21, रा.मेहरूण परिसर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात दोन तरुण घातक शस्त्रे घेऊन दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना 14 एप्रिल रोजी मिळाल्यानंतर त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पाठलागाअंती आरोपी जाळ्यात
पोलिसांनी कासमवाडी ते नेरी नाका दरम्यान असलेल्या एकता चौकातील मोकळ्या मैदानात सापळा रचला. यावेळी एका पल्सर दुचाकीवरून दोन तरुण येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. आरोपींकडे गावठी बनावटीचा कट्टा, एक लोखंडी धारदार कोयता आणि कट्ट्याचे रिकामे मॅगझिन मिळून आले. आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.









