बांधकाम कामगार भांडी योजनेच्या लाभासाठी शंभर रुपयांची लाच : चिंचोलीत कंत्राटी महिला जळगाव एसीबीच्या जाळ्यात

दोन दिवसातील सलग कारवाईने जिल्ह्यात लाचखोर हादरले : 41 हजारांची रोकड जप्त


गणेश वाघ
Bribe of ₹100 for Benefits under Construction Workers Utensil Scheme: Contractual Female Worker in Chincholi Caught in Jalgaon ACB’s Trap भुसावळ (15 एप्रिल 2026) : बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या असंघटित कामगारांसाठी शासनातर्फे मोफत भांडी योजना राबवण्यात येत असून या योजनेचा लाभ देण्यासाठी शंभर रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील महिलेला जळगाव एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. सलग दोन दिवसात झालेल्या एसीबीच्या कारवाईने जिल्ह्यातील लाचखोर हादरले आहेत. आसमा इरफान शेख (शिवाजी नगर, जळगाव, चिंचोली, ता.जळगाव) असे अटकेतील महिलेचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
महाराष्ट्र शासनाचा कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या शासनाच्या योजनेतंर्गत गृह उपयोगी संच वाटप केले जातात व त्यासाठी काही कंत्राटी एजन्सी नेमण्यात आल्या आहेत. चिंचोली येथेदेखील देण्यात आलेल्या एजन्सीत कार्यरत खाजगी इसम आसमा परवीन शेख इरफान यांनी शंभर रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे बुधवारी दिल्यानंतर सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, महिलेकडे तब्बल 41 हजार 250 रुपयांची रोकड आढळल्याने ती जप्त करण्यात आली आहे. संबंधित एजन्सी चालकाची आता चौकशी होणार असून त्यांच्यादेखील अडचणी वाढल्या आहेत.

मोफत योजनेच्या लाभासाठी लाच
बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या असंघटीत कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विविध कल्याणकारी योजना राबवत असते. यामध्ये त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि मूलभूत गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या जातात. अशाच योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार भांडी योजना आहे. या योजनेंतर्गत बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या दैनंदिन उपयोगासाठी आवश्यक असलेल्या स्वयंपाकाच्या भांड्यांचा संच मोफत दिला जातो.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !