पाऊस राज्याच्या उंबरठ्यावर : विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट
मुंबई (5 जून 2026) : राज्यात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम असून पावसाकडे राज्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. राज्यात पावसाच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाने शुक्रवारी विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी जोरदार वादळी पावसाचा अंदाज वर्तवत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. राज्यातील अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वेगवान वार्यांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत मॉन्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
विदर्भात सर्वाधिक तापमान
गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर वर्धा, अकोला आणि नागपूर येथे 42 अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदविण्यात आले. जळगाव, अमरावती, भंडारा आणि गोंदिया येथे 41 अंशांहून अधिक तापमान होते तर मालेगाव, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे 40 अंशांच्या पुढे तापमान गेले. राज्यातील उर्वरित भागांमध्ये तापमान 40 अंशांच्या खाली आले असले तरी उकाडा कायम आहे. दुसरीकडे महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी 18.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट
राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा येथे जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, माण तालुक्यातील दहिवडी आणि मलवडी परिसरात मंगळवारी दुपारनंतर वादळी वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. एका मोठ्या झाडाची फांदी रस्त्यावर कोसळल्याने दहिवडी-मलवडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
खरीप पेरणीसाठी घाई करू नये
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकर्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खरीप पेरणीसाठी कोणतीही घाई करू नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा अंतिम निर्णय घ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे.



