भुसावळातील वांजोळा चौफुली मृत्यूचा हॉटस्पॉट : एकाच महिन्यात दहा अपघात

दीपनगर ते नशिराबाद दरम्यान तीन वर्षांत 45 बळी : वाहनचालकांचा जीव टांगणीला


भुसावळ (10 जून 2026) : भुसावळ महामार्गावरील वांजोळा चौफुली (वांजोळा रोड) हा परिसर सध्या अपघातांचे हॉटस्पॉट बनला आहे. गत अवघ्या एका महिन्यात या चौकात तब्बल 10 भीषण अपघात झाले असून यामुळे परिसरातील सुरक्षेचा व वाहनधारकांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार होणार्‍या या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दिवसभर वाहनांची वर्दळ
नाहाटा चौक उड्डाण पुलावरून उतरणारी वाहने आणि जळगावकडून भुसावळकडे येताना रेल्वे उड्डाणपुलाच्या उतारावरून येणारी वाहने या दोन्ही बाजूंनी अतिशय भरधाव वेगाने धावतात. हा संपूर्ण मार्ग दोन्ही बाजूंनी उताराचा असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नाही. त्यातच महामार्गावरील नियमबाह्य वळणे अपघातांना थेट आमंत्रण देत आहेत. दोन्ही बाजूंना मोठचा संख्येने निवासी वस्ती असल्याने दिवसभर या चौकात लहान-मोठ्या वाहनांची आणि पादचार्‍यांची प्रचंड वर्दळ असते.

तीन वर्षांत 45 मृत्यू
या महामार्गावरील अपघातांची आकडेवारी अंगावर काटा आणणारी आहे. दीपनगर ते नशिराबाद या 28 किलोमीटरच्या पट्ट्यात अवघ्या तीन वर्षांत तब्बल 47 भीषण अपघात झाले असून, यात 45 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये वांजोळा रोड परिसराचा अधिकृतपणे ‘ब्लॅकस्पॉट’ (अतिसंवेदनशील अपघात प्रवण क्षेत्र) म्हणून समावेश झाला आहे.

तर थांबतील अपघात
राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या पद्धतीने आणि नियमबाह्य पद्धतीने दिलेले वळण बंद केल्यास अपघाताना आळा बसेल

चौकात कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना किंवा रस्ता दुभाजकांचे योग्य नियोजन नसल्याने या संदर्भात दखल घेतल्यास अपघात कमी होवू शकतात

अवजड वाहनांच्या बेफाम वेगाला आवर घालण्यासाठी सातत्याने दंडात्मक कारवाया आवश्यक शिवाय उड्डाणपुलावर उतार असल्याने तेथे गतिरोधक असल्यास गतीवर नियंत्रण आल्यास अपघात होणार नाही

अनधिकृत कट बंद करणार
वांजोळा चौफुलीवर अनधिकृतपणे सोडण्यात आलेले कट हेच अपघातांचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. अपघातांची वाढती संख्या पाहता, हे सर्व कट लवकरच मजबूत दुभाजक टाकून पूर्णपणे बंद करण्यात येतील. नागरिकांचा जीव कोणत्याही शॉर्टकट रस्त्यापेक्षा आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. नागरिकांनी अपघातांचा धोका टाळण्यासाठी नाहाटा चौफुली उड्डाणपुलाखालून सुरक्षित मार्गाचा वापर करावा, असे नहींचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे म्हणाले.

नियमांची पालन करणे आवश्यक
महामार्गावरील नियमांचे वाहनधारकांनी पालन करावे. ज्या ठिकाणी अधिकृतरित्या एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट दिलेले आहे, त्याच रस्त्याचा वापर करावा. महामार्गाच्या मध्येच रस्ता तोडून बॅरिकेड तोडून नियमाचे उल्लंघन करू नये. यामुळे आपलाही जीव सुरक्षित राहतो, असे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !