निपुणतेची टक्केवारी न वाढल्यास मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर होणार कारवाई

भुसावळात निपुण भारत अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहविचार आढावा बैठक उत्साहात


भुसावळ (10 जून 2026) : भुसावळ पंचायत समितीचा शिक्षण विभागाच्या वतीने निपुण भारत अभियानांतर्गत अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षकांची सहविचार आढावा बैठक पुंडलिक गणपत बर्‍हाटे विद्यालयात झाली.

प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी भुसावळ तालुक्यातील प्रत्येक शाळेच्या निपुण भारत अभियानातील प्रगतीचे परीक्षण केले. यावेळी त्यांनी शून्य टक्के निपुण शाळांतील शिक्षकांना समज दिली तसेच 10 ते 40 टक्के निपुणता असलेल्या शाळांना 15 जूनपासून पुढील दोन महिन्यांत निपुणतेची टक्केवारी वाढविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. 50 ते 80 टक्के निपुणता असलेल्या शाळांनी किमान 15 ते 20 टक्के विद्यार्थ्यांच्या निपुण क्षमतेत वाढ करावी, असे निर्देश देण्यात आले. दोन महिन्यांत अपेक्षित प्रगती न झाल्यास संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांवर कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही निलेश पाटील यांनी दिला.

यांची होती उपस्थिती
बैठकीस जिल्हा परिषद जळगावचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, डायट जळगावचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.चंद्रकांत साळुंखे, भुसावळ गटविकास अधिकारी डी.जी.जाधव, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी. धाडी, तुषार प्रधान, मुख्याध्यापक पी.जे.चौधरी व हेमांगिनी चौधरी, संजय गायकवाड, सचिन पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आवश्यक : गटशिक्षणाधिकारी
प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी तालुक्यातील शाळांच्या निपुण स्तराचा सविस्तर आढावा सादर केला. यावेळी त्यांनी शिक्षकांनी वेळेवर शाळेत उपस्थित राहणे, किरकोळ व अर्जित रजा नियमानुसार भरणे, शिस्तीचे पालन करणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतःच्या मुलाप्रमाणे पाहून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले.

साहित्याचा करा प्रभावी वापर
यानंतर डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी निपुण भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी डायटमार्फत दररोज अध्यापनासाठी आवश्यक पीडीएफ व मार्गदर्शक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. शिक्षकांनी या साहित्याचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांचा निपुण स्तर वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

सहविचार सभेतही मार्गदर्शन
आढावा बैठकीनंतर गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची सहविचार सभा घेतली. प्रत्येक शाळा शंभर टक्के निपुण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करावे, तसेच पीजीआय इंडिकेटरमध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशा मार्गदर्शक सूचना त्यांनी दिल्या. सूत्रसंचालन दीपक पाटील तर आभार केंद्रप्रमुख सुनील मोरे यांनी मानले.

ही बैठक यशस्वी करण्यासाठी बीआरसी कार्यालयातील सर्व स्टाफ, विषयतज्ज्ञ, विशेष शिक्षक तसेच पुंडलिक गणपत बर्‍हाटे विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी विशेष सहकार्य केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !