जळगाव बसस्थानकात प्रवाशांच्या महागड्या मोबाईलची चोरी : अल्पवयीन चोरटा जाळ्यात


Expensive mobile phones of passengers stolen at Jalgaon bus stand ; minor thief nabbed जळगाव (10 जून 2026) :  जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात प्रवाशांचे महागडे मोबाईल लांबवणार्‍या अल्पवयीनाला जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून एकूण एक लाख 71 हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले. संशयीताचे अन्य साथीदार असल्याची शक्यता असून त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे.

जिल्हापेठ पोलिसात दाखल होता गुन्हा
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकेत सुरेश नारखेडे हे 29 मे 2026 रोजी कामानिमित्त जळगाव नवीन बसस्थानक परिसरात आले होते. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून एक लाख 32 हजार 500 रुपये किंमतीचा आयफोन लांबवला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासाच्या आधारावर संशयीत ताब्यात
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करण्यात आली तसेच गुप्त बातमीदारांच्या माहितीचा आधार घेण्यात आला. तांत्रिक तपास आणि मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे पोलिसांनी तांबापुरा परिसरातून एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने बसस्थानक परिसरात मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून फिर्यादीचा आयफोन तसेच विविध कंपन्यांचे आणखी चार मोबाईल जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक अनिल वाघ आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !