गुजरातमध्ये संततधार पाऊस : पश्चिम मार्गावरील सात रेल्वे गाड्या रद्द
सुरतकडे जाणार्या प्रवाशांचे हाल : भुसावळ-सुरतसह अमरावती एक्स्प्रेसचा समावेश
Incessant rain in Gujarat: Seven trains on the western route cancelled. भुसावळ (शुक्रवार, 24 जुलै 2026) : गुजरातमध्ये सुरू असलेल्या
संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. रेल्वे रूळांवर पाणी आल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून भुसावळकडून सुरत जाणार्या नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीचा निर्णय घेत 24 आणि 25 जुलै रोजी धावणार्या एकूण सात गाड्या तातडीने पूर्णतः रद्द केल्या आहेत.
24 जुलै 2026 रोजी रद्द झालेल्या गाड्या
09050 भुसावळ – दादर विशेष (भुसावळहून) – पूर्णतः रद्द
20925 सूरत – अमरावती एक्सप्रेस (सूरतहून) – पूर्णतः रद्द
19105 उधना – भुसावळ एक्सप्रेस (उधनाहून) – पूर्णतः रद्द
19106 भुसावळ – उधना एक्सप्रेस (भुसावळहून) – पूर्णतः रद्द
25 जुलै 2026 रोजी रद्द झालेल्या गाड्या
20926 अमरावती – सूरत एक्सप्रेस (अमरावतीहून) – पूर्णतः रद्द
09051 दादर – भुसावळ विशेष (दादरहून) – पूर्णतः रद्द
09052 भुसावळ – दादर विशेष (भुसावळहून) – पूर्णतः रद्द
खबरदारी उपाय म्हणून रेल्वे गाड्या रद्द
सततच्या पावसामुळे काही ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचणे, रेल्वे वाहतुकीच्या गतीवर परिणाम होणे आणि खबरदारीच्या उपाययोजना आवश्यक ठरल्याने ही कार्यवाही करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या अभियांत्रिकी, सिग्नल आणि परिचालन विभागातील अधिकारी व कर्मचारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रेल्वे रुळांसह पुलांची, सिग्नल यंत्रणेची आणि ओव्हरहेड विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी केली जात असून, आवश्यकतेनुसार रेल्वे गाड्यांच्या वेगावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणताही धोका पत्करण्याऐवजी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
प्रवाशांना रेल्वेचे आवाहन
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत रेल्वे संकेतस्थळ, मोबाईल अॅप, रेल्वे चौकशी सेवा किंवा संबंधित स्थानकांमार्फत गाडीची माहिती मिळवूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.



