महाराष्ट्राच्या राजकारणातही हालचालींना वेग : मुख्यमंत्री दिल्लीत ; दौर्याबाबत कमालीची गुप्तता
नवी दिल्ली (शनिवार, 25 जुलै 2026) : विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला मात्र यानंतर राज्यात राजकीय घडामोडी वाढलया आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले असून त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. फडणवीस यांनी कुणा-कुणाची भेट घेतली व त्यात काय चर्चा झाली? याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
तातडीने मुख्यमंत्री दिल्लीत
सीजेपीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा पूर्वनियोजित असल्याचं सांगण्यात आलं. दिल्लीमध्ये फडणवीसांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या भेटीत नेमकं काय झालं याबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली.
अनेक तर्कवितर्क
देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौर्यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या एका दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. देशाचे नवे शिक्षणमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना संधी मिळू शकते, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. फडणवीसांच्या दिल्ली दौर्यामागचं नेमकं कारण काय, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा स्वीकारला
ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं त्यांच्यासमोरच केंद्र सरकारला झुकावं लागले. धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला त्यामुळे गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे.
नीट पेपरफुटी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सीजेपीसह देशभरातील विद्यार्थ्यांनी केली होती. या आंदोलनाचं लोण फक्त दिल्लीपर्यंत मर्यादीत राहिलं नाही तर ते संपूर्ण देशात पसरल्याने सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात एखाद्या जनआंदोलनामुळे थेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर सीजेपी आणि सरकारमध्ये बैठक पार पडली. सीजेपीच्या अन्य प्रमुख मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली आणि उर्वरित तीन मागण्यादेखील सरकारने मान्य केल्याचे त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जाहीर केले.



