भालोदला रेणुका माता स्वयंसेविका महिला बचत गटात सायबर सुरक्षा जनजागृती
यावल (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील भालोद येथील रेणुका माता स्वयंसेविका महिला बचत गटात क्विक हिल फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थिनी टीना पाटील आणि दर्शना चौधरी यांनी महिलांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन
या सत्रात महिलांना ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार, संशयास्पद फोन कॉल, बनावट मेसेज, ओटीपीव्दारे फसवणूक, फेक लिंक, सोशल मीडिया तसेच ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी सतर्कता व जागरूकता किती महत्त्वाची आहे, हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले. महिलांनी या जनजागृती सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले.
डिजिटल व्यवहाराबाबत जागृकता
या उपक्रमामुळे महिला बचत गटातील सदस्यांमध्ये डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन जगतात सुरक्षित राहण्याबाबत जागरूकता निर्माण झाली. सायबर सुरक्षिततेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.


