अवैध सावकारांविरोधात मोठी कारवाई : सावदा पोलिसात रावेर तालुक्यातील तिघांविरोधात गुन्हा

पहिल्या प्रकरणात 37 लाखांपेक्षा अधिक रक्कम वसुल तर दुसर्‍या प्रकरणात शेतीच हडपली


सावदा, ता.रावेर (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) :  बेकायदेशीररीत्या चक्रवाढ व्याजाने कर्ज देऊन, कर्जदाराची जमीन स्वतःच्या नावावर करून घेत तब्बल 37 लाख 74 हजार 325 रुपयांची अवैध वसुली केल्याप्रकरणी जळगाव जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशान्वये सावदा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुंभारखेडा, ता.रावेर येथील दोघांसह सावद्यातील एका संशयीताचा समावेश आहे. जिल्ह्यात अद्यापही मोठ्या प्रमाणावर अवैध सावकारी सुरू असल्याचा प्रकार यातून समोर आला असून कारवाईचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे.

सहकार विभागाच्या कारवाईने खळबळ
पहिली तक्रार सहकार अधिकारी प्रदीप माधवराव महाजन यांनी दिली. त्यानुसार अर्जदार चुडामण नारायण जंगले आणि त्र्यंबक नारायण जंगले (रा.कुंभारखेडा, ता. रावेर) यांनी संशयित आरोपी अशोक जगन्नाथ पाटील (75) व राजेंद्र जगन्नाथ पाटील (60, दोघे रा.कुंभारखेडा, ता.रावेर) यांच्याकडून शेती लागवडीसाठी चार लाखांचे कर्ज घेतले व . संशयित आरोपींनी या कर्जावर बेकायदेशीररीत्या चक्रवाढ व्याज आकारून कर्जदाराची कौटुंबिक वडीलोपार्जित शेती स्वतःच्या नावावर करून घेतली. कर्जदाराने मूळ रक्कम आणि व्याज मिळून एकूण 33 लाख 39 हजार597/- रुपये परत केले असतानाही, संशयितांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करून आणि केळी पिकाच्या उत्पन्नाची गुप्तपणे विक्री करून एकूण 37 लाख 74 हजार 325/- रुपयांची अतिरिक्त बेकायदेशीर वसुली केली.

तक्रारीची दखल अन गुन्हा
या गंभीर आर्थिक फसवणुकीबाबत अर्जदारांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे दाद मागितली होती. जिल्हा उपनिबंधकांनी या अवैध सावकारी तक्रारीची सखोल चौकशी केल्यानंतर
जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार, सावदा पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध गु. र. नं. 215/2026, महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.

कर्ज फेडल्यानंतरही शेती परत करण्यास टाळाटाळ
दुसर्‍या प्रकरणात सहकारी संस्था, रावेरचे अधीन सहाय्यक निबंधक प्रदीप माधवराव महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गैरअर्जदार नंदकुमार मुकुंदा पाटील (60, सावदा, ता.रावेर) विरोधात सावदा पोलीस ठाण्यात बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार अर्जदार मंदाबाई मनोहर पाटील (54, रा.कुंभारखेडा, ता. रावेर) यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे बेकायदेशीर सावकारीबाबत तक्रार अर्ज केला. मंदाबाई पाटील यांचे पती कै. मनोहर प्रल्हाद पाटील यांनी गैरअर्जदार नंदकुमार मुकुंदा पाटील (60, सावदा, ता.रावेर) यांच्याकडून कर्जापोटी व्याजाने रक्कम घेतली होती. या रक्कमेच्या सुरक्षिततेसाठी आणि गहाण तारण म्हणून त्यांनी आपल्या शेतीचे खरेदीखत करून दिले. कर्जाची परतफेड व्याजासह केल्यानंतरही गैरअर्जदाराने शेती परत करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर व्याजापोटी आणखी एक शेत खरेदी करून घेतले. गैरअर्जदाराने बेकायदेशीर सावकारीच्या माध्यमातून मंदाबाई पाटील व त्यांच्या कुटुंबाचा विश्वासघात करून त्यांची शेती हडप केल्याचा आरोप आहे.

या तक्रारीच्या चौकशीअंती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांनी ’महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014’ च्या कलम 18 (1) व (2) नुसार आदेश पारित करण्यात आले तर गैरअर्जदार नंदकुमार मुकुंदा पाटील यांच्याकडे सावकारीचा कोणताही परवाना नसताना त्यांनी बेकायदेशीर सावकारी केल्याचे निष्पन्न झाल्याने सावदा पोलीस ठाण्यात ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014’ च्या कलम 39 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सावदा पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !