जोगलखेडे-भानखेडे जि.प. शाळांमध्ये रक्तगट तपासणी शिबिर

चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयाचा उपक्रम : विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही तपासणी


भुसावळ (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : भुसावळ तालुक्यातील जोगलखेडे व भानखेडे येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये साकेगाव येथील चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासण्यात आले. त्यांच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यक औषधोपचारही करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन जोगलखेडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सारीका पंकज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माणिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले.

यावेळी डॉ.वैभव पाटील, डॉ.मनीष ईश्वरकर, डॉ.प्रियंका धानोरकर, लॅब टेक्निशियन प्रवीण उगले तसेच प्रशिक्षणार्थी डॉ.विनोद पांढरे, सुमित महाजन, राजेश राऊत आणि तेजस्विनी देशमुख यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले.

शिबिरास जोगलखेडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र झांबरे, भानखेडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गणेश फेगडे, उपशिक्षिका सोनाली तायडे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासह त्यांच्या रक्तगटाची माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थ व शाळा प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !