भुसावळातील के. नारखेडे विद्यालयात शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती : विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा 

मूर्तिकार ललित भोरटके यांचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण ; जलप्रदूषण रोखण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाले व्यासपीठ


भुसावळ (शनिवार, 22 ऑगस्ट 2026) : भारतीय पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शहरातील के.नारखेडे विद्यालयात ‘पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनविणे’ या विशेष कार्यशाळेचे शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत शाडू मातीपासून आकर्षक व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी उपक्रम
सध्याच्या काळात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या कृत्रिम मूर्तींचा वापर होत असल्याने जलप्रदूषणासह पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, प्रत्येकाने ज्ञान व बुद्धीची देवता श्री गणेशाची मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्याचा संकल्प करावा तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलात्मक व सर्जनशील गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
मुख्याध्यापिका एस.ए.अडकमोल व उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक एम.व्ही.गरुडे यांनी शनिवार, 22 ऑगस्ट 2026 रोजी या उपक्रमाचे आयोजन केले.
विद्यार्थ्यांनी सादर केल्या पर्यावरणपूरक मूर्त्या
कार्यशाळेसाठी सावदा येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार ललित भोरटके यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीचा योग्य वापर करून गणेशमूर्ती अगदी सहज व सोप्या पद्धतीने कशी तयार करावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या कल्पकतेच्या बळावर सुंदर, आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या.
या कार्यशाळेला संस्थेचे सदस्य पी. व्ही. पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाडू मातीपासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तींचा वापर केल्यास जलप्रदूषण टाळण्यास मोठी मदत होऊ शकते. तसेच विसर्जनानंतर गणेशमूर्तींची होणारी विटंबनाही टाळता येते, असा पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यशाळेस पर्यवेक्षक एस.एल.राणे व बी.बी.जोगी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल संस्थाध्यक्ष मकरंद नारखेडे यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा देत विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील यांच्यासह संगणक शिक्षकांनीही कार्यशाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध गणेशमूर्ती पाहून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. पालकांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
यशस्वीतेसाठी एस.पी.महाजन, कांचन राणे, रिता महाजन, एस. एस. कापसे, शिक्षकेतर कर्मचारी जयेश बर्‍हाटे, शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्काऊट्स यांनी मोलाचे सहकार्य केले.पर्यावरण संवर्धन, भारतीय संस्कृतीचे जतन आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन या तिन्ही उद्दिष्टांचा सुंदर संगम या कार्यशाळेत पाहायला मिळाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !