दीपनगरातील पारेषण कंपनीतील अभियंत्याचा अपघाती मृत्यू
बेशिस्त बल्कर नागरिकांच्या जीवावर : आरटीओ प्रशासनासह पोलीस विभागाकडून दररोज मोहिम राबवण्याची अपेक्षा
भुसावळ (रविवार, 23 ऑगस्ट 2026) : दीपनगर 500 मेगावट औष्णिक केंद्राजवळ वीज पारेषण कंपनीच्या 400 केव्ही उपकेंद्रातील कार्यकारी अभियंता किशोर देविदास दांडगे (52 रा.प्लॉट क्रमांक 68, प्रल्हादनगर, भुसावळ) यांचा शनिवारी सकाळी अपघाती मृत्यू झाला. दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले किशोर दांडगे हे दिव्यांगासाठी असलेल्या तीनचाकी मोपेड बाहनावरुन घरी जात असताना वाहनाच्या धडकेने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
भुसावळ तालुका पोलिसात नोंद
सूत्रानुसार, अभियंता किशोर दांडगे हे त्यांच्या तीन चाकी मोपेडद्वारे घराकडे निघाल्यानंतर निंभोरा गावाजवळील हॉटेल त्रिमूर्ती समोर त्यांच्या दुचाकीला वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. बेशुद्धावस्थेत त्यांना ट्रामा सेंटरमध्ये हलवल्यानंतर त्यांना मयत घोषित करण्यात आले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार योगेश पालवे करीत आहेत.
बेशिस्त बल्कर चालकांवर हवी दररोज कारवाई
दीपनगर औष्णिक केंद्रातून किमान 125 ते 150 बल्करने दररोज राख वाहतूक होते. यातील बरेच बल्कर महामार्गावर पार्किंग होतात. यापूर्वी निभोरा, पिंप्रीसेकम येथील नागरिकांनी बल्करच्या पार्किंगप्रश्नी आंदोलन केले होते. यानंतर भुसावळचे आमदार व मंत्री संजय सावकारे यांनी महामार्ग सुरक्षा समितीच्या बैठकीत हा मुद्दा मांडल्यानंतर कारवाई झाली मात्र त्यानंतर बल्कर चालकांची पुन्हा मनमानी वाढली असून आरटीओ प्रशासन व स्थानिक पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


