यावल बस आगारात बस लोकार्पण सोहळ्यात नगराध्यक्षांचा प्रोटोकॉल डावलला !

भाजपा पदाधिकारी विकासकामांपेक्षा सत्ता व खुर्चीचे भूकेले : अतुल पाटील यांची कार्यक्रमावर बहिष्कारानंतर टीका


यावल (रविवार, 23 ऑगस्ट 2026) : शासनाकडून पाच नवीन बसेस उपलब्ध झाल्यानंतर त्याचा लोकार्पण सोहळा रविवार, 23 रोजी यावल आगारात आयोजित करण्यात आला मात्र या सोहळ्यात लोकप्रतिनिधी नसलेले भाजपा पदाधिकारी व्यासपीठावर आसनस्थ झाले मात्र शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा छायाताई अतुल पाटील यांचा मान राखण्यात आला नाही शिवाय पोटोकॉलही पाळण्यात न आल्याने दाम्पत्याने कार्यक्रमावर बहिष्कार टाकून कार्यक्रमस्थळ सोडले. माध्यमांशी बोलताना नगरसेवक अतुल पाटील यांनी भाजपा पदाधिकार्‍यांवर कणखर शब्दात टीका केली. भाजपा पदाधिकारी विकासकामांपेक्षा सत्ता व खुर्चीचे भूकेले असल्याचे म्हणत त्यांनी आमदार अमोल जावळे या प्रकाराला समर्थन करणार का? असा प्रश्नही विचारला.

यावलला लोकार्पण सोहळ्यात फुटले श्रेयवादाचे फटाके
आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने पाच नव्या बसेस यावल आगाराला उपलब्ध करून दिल्या. या बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल जावळे लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत रविवारी होणार होता मात्र आमदार उपस्थित न राहिल्याने तेथे शहराच्या प्रथम नागरिक व नगराध्यक्षा छायाताई पाटील व त्यांचे पती व नगरसेवक अतुल पाटील उपस्थित होते. एस.टी.आगाराने रितसर नगराध्यक्षांना निमंत्रण दिले मात्र यावेळी भाजपा पदाधिकार्‍यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा ताबा घेतल्याचा आरोप अतुल पाटील यांनी केला.




प्रोटोकॉलही डावलल्याचा आरोप
या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा छायाताई पाटील उपस्थित असतानाही त्यांना व्यासपीठावर योग्य सन्मानाचे स्थान न देता बाजूच्या खुर्चीवर बसवण्यात आले शिवाय कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या दीपप्रज्वलनाच्या वेळी त्यांचे नाव उशिराने घेण्यात आले. सत्काराच्या वेळीही आवश्यक तो प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. सूत्रसंचालन व नियोजन करण्याची जबाबदारी प्रामुख्याने आगार प्रशासनाची असताना काही भाजप पदाधिकार्‍यांनी कार्यक्रमात माईक हातात घेऊन सूत्रसंचालनात हस्तक्षेप केल्याने शासकीय कार्यक्रमाचे स्वरूप बाजूला पडून कार्यक्रमावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप अतुल पाटील यांनी केला.

हा लोकप्रतिनिधीचा नव्हे तर शहराचा अपमान : अतुल पाटील
या संपूर्ण प्रकारामुळे संतप्त झालेल्या अतुल पाटील यांनी आगार प्रशासन व संबंधित भाजप कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकनियुक्त नगराध्यक्षांचा सन्मान आणि शासकीय कार्यक्रमातील प्रोटोकॉल पाळला जात नसेल तर हा संपूर्ण यावल शहराचा अपमान असून अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका घेत त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

लोकप्रतिनिधींचा सन्मान हा पक्षीय राजकारणापेक्षा मोठा
शासकीय कार्यक्रम कोणत्याही एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसतो. अशा कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकनियुक्त लोकप्रतिनिधींना त्यांच्या पदानुसार योग्य सन्मान व प्रोटोकॉल मिळणे अपेक्षित असते. यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका अतुल पाटील यांनी यावेळी मांडली. राजकारण करायचे असेल तर ते निवडणुकीच्या मैदानात करा मात्र शासकीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा प्रोटोकॉल आणि सन्मान पायदळी तुडवून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अतुल पाटील यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

बसेस कुठल्या पक्षाच्या मालकीच्या अजिबात नाही
सविस्तर भूमिका मांडताना नगरसेवक अतुल पाटील म्हणाले की, लोकप्रतिनिधी नसलेले भाजप पदाधिकारी आसनावर विराजमान झाले व आम्हाला बाजूला आसन देण्यात आले, याची आम्हाला नाराजी नव्हती पण दीपप्रज्वलनासाठी नगराध्यक्षांना उशिरा आमंत्रित करणे, प्रोटोकॉल न पाळणे आणि शासकीय कार्यक्रमाच्या बॅनरवर पक्षाचे कमळ चिन्ह वापरणे हा प्रकार निश्चितच निषेधार्ह आहे. यावल आगारासाठी उपलब्ध पाचही बसेस जनतेच्या करातून आणि शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या असून त्या कोणत्याही एका पक्षाच्या मालकीच्या नाहीत त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला पक्षीय रंग देऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न का? भाजपचे काही पदाधिकारी विकासाच्या कामापेक्षा खुर्ची आणि श्रेयासाठीच भुकेले असल्याचे या कार्यक्रमातून दिसून येते, असे अतुल पाटील यांनी सांगत अशा कार्यक्रमास आमदार अमोल जावळे समर्थन करणार का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

राजकीय द्वेषातून आरोप : कुणाचाही अवमान झाला नाही
आमदार अमोल जावळे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी सुरूवातीला पाच व आता पाच बसेस उपलब्ध करून दिल्याने आम्ही स्वयंस्फूर्तीने कार्यक्रमा उपस्थित राहिलो. या कार्यक्रमासाठी संपूर्ण यावल तालुक्याचे महायुतीचे पदाधिकारी तेथे उपस्थित होते. नगराध्यक्षांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले त्याचे फोटोदेखील आहेत. पाटील दाम्पत्याचा एस.टी.प्रशासनाने सत्कारदेखील केला व दीपप्रज्वलन करण्यासाठी त्यांनाही बोलावण्यात आले त्यामुळे कुठलाही वा कुणाचाही अवमान करण्याचा प्रश्नच येतच नाही, असे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्य हिरालाल चौधरी म्हणाले. राजकीय द्वेषातून अतुल पाटील हे आरोप करीत असल्याचा दावा यावेळी चौधरींनी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !