शनीपेठ पोलिसांची मोठी कारवाई : चोरीच्या तीन दुचाकींसह एरंडोलचा संशयीत जाळ्यात

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांची कारवाई


जळगाव (रविवार, 23 ऑगस्ट 2026) :  शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकलचा शोध घेताना शनीपेठ पोलिसांनी प्रभावी कारवाई करीत एरंडोल येथील संशयीताच्या मुसक्या बांधल्या आहेत. आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेल्या दुचाकीसह अन्य दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. शेख ईरफान शेख रईस (एरंडोल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

तपासादरम्यान पोलिसांची कारवाई
शनिपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील बालाजी पेठ येथून 13 ऑगस्ट 2026 रोजी पल्सर मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी 18 ऑगस्ट रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. या प्रकरणी शेख ईरफान शेख रईस (एरंडोल) याचे नाव निष्पन्न होताच त्यास एरंडोल बसस्थानकातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून चोरीच्या बजाज कंपनीच्या दोन व होंडा कंपनीची युनिकॉन अशा तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, परिवेक्षाधीन उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, हवालदार विजय खैरे, हवालदार योगेश जाधव, कॉन्स्टेबल पराग दुसाणे, कॉन्स्टेबल अमोल वंजारी, कॉन्स्टेबल निलेश घुगे, गणेश ढाकणे, योगेश साबळे, मुबारक देशमुख आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !