भुसावळात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंनी केली मिरवणूक मार्गांची पाहणी
रस्ते, वीज तारा, सीसीटीव्हीबाबत संबंधित विभागांना पत्र देण्याच्या सूचना ः गणेशोत्सवासह ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांसाठी वाहतूक शाखेने नियोजन करण्यावर भर
भुसावळ (सोमवार, 24 ऑगस्ट 2026) : आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात मिरवणुकांदरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेने प्रभावी नियोजन करावे, मिरवणूक मार्गावर कोणतेही वाहन उभे राहणार नाही तसेच संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी शक्य तितका मोकळा ठेवण्यात यावा, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी येथे दिल्या.
भुसावळात मिरवणूक मार्गाची केली पाहणी
जिल्हा पोलीस अधीक्षक धिवरे यांनी शनिवारी भुसावळ शहरात येऊन आगामी ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या मिरवणूक मार्गांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मिरवणूक मार्गावरील संभाव्य अडथळे,वाहतुकीची कोंडी होण्याची ठिकाणे तसेच संवेदनशील भागांची पाहणी करून संबंधित पोलीस अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.



या भागात केली पाहणी
ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीचा मार्ग रजा टॉवर, अमरदीप चौक, आगाखान वाडा, शिवाजीनगर चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मॉडेल रोड, गांधी पोलीस चौकी, सराफ बाजार, जामा मस्जिद, नाईम पहेलवान गली, मच्छीवाडा, अमरदीप चौक आणि पुन्हा रजा टॉवर असा आहे. या संपूर्ण मार्गाची अधिकार्यांनी पाहणी केली. या पाहणीवेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, डीवायएसपी केदार बारबोले, परिविक्षाधीन डीवायएसपी प्रशांत दरेकर, निरीक्षक राहुल वाघ, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक राहुल भंडारे यांच्यासह शहर व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच गोपनीय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
दगडी पूल, बाजारपेठेतील पुलाचीही पाहणी
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी करताना अधीक्षक धिवरे यांनी दगडी पूल तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोरील पुलाचीही पाहणी केली. मिरवणुकीदरम्यान या ठिकाणी वाहतुकीची कोंडी अथवा अन्य अडचण निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक ते नियोजन आतापासूनच करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुलांची उंची आणि मिरवणुकीदरम्यान येणार्या अडचणींचीही त्यांनी माहिती घेतली.
पालिका, वीज कंपनीला पत्र देण्याच्या सूचना
शहरातील रस्त्यांची स्थिती, मिरवणूक मार्गावरील अडथळे आणि आवश्यक दुरुस्त्यांबाबत पालिकेला पत्र देण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी केल्या.तसेच मिरवणूक मार्गावर कुठे वीजतारा लोंबकळत असल्यास त्याची माहिती घेऊन संबंधित वीज कंपनीला पत्र देण्यात यावे,असेही त्यांनी सांगितले. मिरवणूक मार्गावर कोणत्या विभागाशी संबंधित अडचणी आहेत, याची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकार्यांना वेळेत पत्र देऊन त्यावर उपाययोजना करून घ्याव्यात.सणांच्या काळात ऐनवेळी अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सीसीटीव्ही सुरू असल्याची खात्री करा
शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत की नाही, याची खात्री करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या. मिरवणूक मार्गासह संवेदनशील ठिकाणांवरील सीसीटीव्ही यंत्रणा तपासून आवश्यक त्या ठिकाणी निगराणी वाढवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणार्या तसेच उपद्रव निर्माण करणार्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. गरज भासल्यास उपद्रवींवर शहरबंदीची कारवाई करण्याच्या सूचनाही आढावा बैठकीत देण्यात आल्या.

