विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव निर्माण करण्यासाठी थोरगव्हाण विद्यालयात आज ‘अपूर्व विज्ञान मेळावा
थोरगव्हाण, ता.रावेर (सोमवार, 24 ऑगस्ट 2026) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व वैज्ञानिक जाणीव निर्माण व्हावी, तसेच विज्ञानातील विविध संकल्पना कृतीतून अधिक स्पष्ट व्हाव्यात, या उद्देशाने दि. एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण संचलित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवार, 25 ऑगस्ट मंगळवार रोजी ‘अपूर्व विज्ञान मेळावा’ होत आहे.
40 प्रयोग होणार सादर
जीवशास्त्र, भौतीकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांतील सुमारे 40 प्रयोग विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात येणार आहेत. ‘टाकाऊ वस्तूंपासून विज्ञानाचे रहस्य’ या संकल्पनेतून बालवैज्ञानिक विविध प्रयोग व वैज्ञानिक प्रतिकृती सादर करणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतर्फे आवश्यक प्रमुख साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.



मेळाव्याचे हे दुसरे वर्ष असून, विद्यार्थ्यांनी ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेवर आधारित विविध वस्तू व वैज्ञानिक प्रतिकृती तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून तयार केलेल्या विविध प्रयोगांद्वारे वैज्ञानिक शोध आणि संकल्पना अधिक सोप्या व स्पष्ट पद्धतीने मांडल्या आहेत.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण, प्रयोगशीलता, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होत आहे. मेळाव्याचे आयोजन विज्ञान समितीच्या वतीने करण्यात आले असून, अपूर्व विज्ञान मेळाव्याचे विज्ञान शिक्षकांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. कलाशिक्षक एस बी सपकाळे यांनी कार्यक्रमाला साजेशे प्रभावी फलक लेखन केले
उत्कृष्ट प्रयोग सादरीकरणासाठी विज्ञान शिक्षक के.पी.चौधरी यांनी पारितोषिके ठेवली आहेत. दि. एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाणचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, मुख्याध्यापक डी.के.पाटील तसेच ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.आयोजक विज्ञान समिती प्रमुख के.पी.चौधरी, एन.बी.चौधरी, पी.सी.कचरे, एस.पी.पाटील, एन.ए.देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

