अट्रावलला गंभीर गुन्ह्यातील संशयीत पोलिसांना शरण
मार्च महिन्यात घडला होता गुन्हा : संशयीत पोलिसाला केले निलंबित
यावल (मंगळवार, 25 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील अट्रावल येथील महिला व तिच्या मुलीला गंभीर मारहाण केल्याप्रकरणी पसार असलेला आरोपी पोलीस शिपाई बादल अनिल तायडे उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर तो रविवार, 23 ऑगस्ट रोजी यावल पोलीस ठाण्यात शरण आल्याने त्याला अटक करण्यात आली.त्यास सोमवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे प्रकरण ?
अट्रावल, ता.यावल या गावात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर 28 मार्च 2026 रोजी ग्रामपंचायत मार्फत वाड्यात विकास कामाचा ठेका घेवुन काम केल्यावरून वाद झाला आणि या वादातून आरती अरविंद भालेराव (36) व विजया दिलीप तायडे (60) या दोन महिलांना पोलीस कर्मचारी बादल अनिल तायडे, नयना बादल तायडे, सागर अनिल तायडे, मायाबाई अनिल तायडे, प्रफुल गोपीचंद निकुंभे, सुमित भालेराव व सागर तायडे या सात जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली.



लोखंडी रॉड, लोखंडी खुरपीच्या साह्याने त्यांच्यावर प्राण घातक हल्ला चढवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात विजया तायडे यांच्या फिर्यादीवरून सात जणाविरुद्ध जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात सहा जणांना अटक करण्यात आली व या सर्व सहा जणांविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र देखील सादर करण्यात आले.
या गुन्ह्यातील संशयीत पोलीस कर्मचारी बादल तायडे हा पसार होता व त्याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. संशयीत रविवारी यावल पोलिसात शरण आल्याने त्यास अटक करण्यात आली. संशयीत सोमवारी यावल येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.आर.एस.जगताप यांच्या समोर हजर केले असता त्याला मंगळवारपर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे करित आहे.
पोलीस कर्मचारी सेवेतून निलंबित
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी बादल तायडे यास 31 मार्च रोजी निलंबीत करण्यात आले व खात्याअंतर्गत प्राथमिक चौकशी करून 18 जुन रोजी अहवाल सादर करण्यात आल्यानंतर दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्यात आली.
