भुसावळात शॉक लागल्याने महावितरणच्या कर्मचार्‍याचा मृत्यू

डी.एस.कॉम्प्लेक्समधील दुर्दैवी घटना : शहर पोलिसात नोंद


भुसावळ (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : विद्युत बिघाड झाल्यानंतर आलेल्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी डी.एस.कॉम्प्लेक्समध्ये गेलेल्या महाविरतणच्या लाईनमनचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली. वैभव पुरुषोत्तम दांडेकर (35, रा.गोरक्षण संस्था, जामनेर रोड, भुसावळ) असे मयत कर्मचार्‍याचे नाव आहे. या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचार्‍यांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली. शहर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अचानक लागला शॉक
महावितरणचे कर्मचारी अजय निवृत्ती चौधरी (वय 26, रा. मैनाबाई नगर, रिंगरोड, भुसावळ) यांनी भुसावळ शहर पोलिसात दिलेल्या खबरीनुसार, ते महावितरणमध्ये वायरमन आहेत. गुरुवारी रात्री 12 ते सकाळी 8 या वेळेत त्यांच्यासह सहकारी दीपक लिधुरे व वैभव पुरुषोत्तम दांडेकर (35, रा. गौरक्षण संस्था, जामनेर रोड, भुसावळ) यांची ड्युटी होती. परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याची ग्राहक तक्रार प्राप्त झाल्यानंतर तिघेही गांधीपुतळा चौकातील पेट्रोलपंपासमोर असलेल्या डी.एस. कॉम्प्लेक्सजवळील 11 केव्ही कटपॉईंट खांबावरील फॉल्ट तपासण्यासाठी गेले. वैभव दांडेकर हे कॉम्प्लेक्सच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायर्‍यांनी वर गेल्यानंतर त्यांना अचानक विजेचा धक्का बसला व ते खाली कोसळले.



वरिष्ठ अधिकार्‍यांची धाव
घटनेनंतर सहकार्‍यांनी तातडीने वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली. महावितरणचे सहायक अभियंता अजय गावंडे हे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बेशुद्धावस्थेतील वैभव दांडेकर यांना तातडीने ट्रामा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !