भुसावळातील गायत्री शक्तीपीठमध्ये श्रावणी प्रदोषानिमित्त सामूहिक रुद्राभिषेक
भुसावळ (शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026) : शहरातील गायत्री शक्तीपीठ संचलित गायत्री मंदिरात पवित्र श्रावण महिना आणि प्रदोष तिथीच्या शुभमुहूर्तावर सामूहिक रुद्राभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. श्रावणी मंगळवारी आलेल्या प्रदोषाचे औचित्य साधून या विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सामूहिक रुद्राभिषेकादरम्यान मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. शहरातील बहुसंख्य नागरिकांनी व शिवभक्तांनी या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन भगवान शंकराला जलाभिषेक व दुग्धाभिषेक करत शिव आराधना केली.



मार्गदर्शन व संयोजन: हा संपूर्ण आध्यात्मिक उपक्रम पल्लवी बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. उपस्थित भाविकांना पूजेचे धार्मिक महत्त्व आणि श्रावण महिन्यातील शिव उपासनेचे फळ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
आगामी काळात सुरू होणार्या पितृपक्ष पंधरवड्याचे औचित्य साधून गायत्री मंदिर परिवारातर्फे विशेष ’जलदान कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमातही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
पूजा झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गायत्री मंदिरातील स्वयंसेवकांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
