कडगावातील बॅटरी चोरटा सावदा पोलिसांच्या जाळ्यात
तीन चोरीच्या तीन बॅटरी व दुचाकीसह 71 हजारांचा मुद्देमाल जप्त
सावदा, ता.रावेर (शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026) : सावदा पोलिसांनी रात्र गस्तीदरम्यान यावल तालुक्यातील कडगावातील बॅटरी चोरट्या संशयीताला ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीच्या तीन मोठ्या बॅटर्या तसेच गुन्ह्यातील दुचाकीसह एकूण 71 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गस्तीदरम्यान पोलिसांची कारवाई
शुक्रवारी पहाटे सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व होमगार्ड हतनूर धरणाकडून हतनूर गावाकडे जाणार्या रस्त्यावर रात्रगस्तीवर असताना दिड वाजेच्या सुमारास उदळी गावाच्या बसस्थानकाजवळ पोलिसांना एका मोटारसायकलवर दोन संशयीत गोणपाटात काहीतरी नेताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला मात्र संशयीत पसार होण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना गाठले. यावेळी मोटारसायकल चालवणारा इसम पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत गल्लीबोळातून पसार झाला मात्र पाठीमागे बसलेला संशयीत विशाल शांताराम कोळी (28, कडगाव, ता.यावल, जि.जळगाव) यास ताब्यात घेण्यात आले. संशयीताकडून 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 बी.एफ.9347) व 21 हजार रुपये किंमतीच्या तीन बॅटरी जप्त करण्यात आल्या. तीन्ही बॅटर्या जळगाव शहरातील रस्त्यावर लावलेल्या ट्रकमधून आरोपींनी चोरल्याचा संशय आहे. पोलीस कर्मचारी सुनील जानकिराम कुरकुरे यांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.



यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस हवालदार अक्षय हिरोळे, कॉन्स्टेबल सुनील कुरकुरे, संजय तडवी, होमगार्ड प्रशांत पाटील, संतोष सपकाळे आदींच्या पथकाने केली.

