सावदा पोलिसांची मोठी कारवाई : पाच लाख 28 हजारांच्या गुटख्यासह अकलूदचा संशयीत जाळ्यात
सावदा, ता.रावेर (शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026) : सावदा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका कारमधून प्रतिबंधीत गुटख्याची वाहतूक होत असताना कारवाई केली. यावल तालुक्यातील अकलूद येथील संशयीताच्या वाहनातून पाच लाख 28 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. गुटखा व कारसह एकूण 10 लाख 27 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सावदा सहा.निरीक्षक गणेश फड यांना गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. 27 रोजी रात्री 10.50 वाजेच्या संशयीता होंडा अमेझ कार (एम.एच.19 सी.व्ही.4445) आल्यानंतर चालक सारंग मुरलीधर अवचार (31, रा. अकलूद, ता.यावल) याच्याकडे चौकशी केली असता त्याने कारमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याची कबुली दिली. यावेळी विमल पानमसाला आणि तंबाखूचे वेगवेगळे पाकीट मिळून पाच लाख 28 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त तसेच पाच लाखांची कार मिळून 10 लाख 27 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



भुसावळसह वरणगावात विक्रीचा डाव उधळला
आरोपीने प्रतिबंधित माल मध्यप्रदेशातील बर्हाणपूरच्या व्यापार्याकडून भुसावळ आणि वरणगाव परिसरात किरकोळ विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. याप्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, हवालदार निलेश बाविस्कर आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.

