व्हिडिओ काढल्याच्या रागातून डांभूर्णीतील सरपंचाचा गावठी कट्ट्यातून गोळीबार : पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भुसावळातील तरुणाकडून घेतला कट्टा : दहशत निर्माण करण्यासाठी केला गोळीबार


यावल (शनिवार, 29 ऑगस्ट 2026)  हॉटेलमध्ये बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याचा व्हिडिओ काही कार्यकर्त्यांनी काढल्याच्या रागातून यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे भर चौकात कोळीन्हावीतील सरपंचांनी देशी कट्यातून हवेत गोळीबार केला व परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी यावल पोलिसांनी तातडीने कारवाई करत कोळन्हावी येथील विद्यमान सरपंच विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (37) यांना जळगावात बेड्या ठोकल्या. गोळीबारासाठी वापरण्यात आलेला देशी कट्टा व जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?
डांभूर्णी, ता.यावल येथील भर चौकात एक व्यक्ती गावठी कट्ट्यातून हवेत फायरिंग करत असल्याची माहिती यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांना गुरुवारी रात्री मिळाली होती. त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळी रिकामी पुंगळी पोलिसांनी पुरावे केले जप्त घटनास्थळी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिल गणेश, अनिल साळुंखे, हितेश बागुल आदी अधिकारी व कर्मचारी तातडीने पोहोचले. परिस्थितीची पाहणी केली असता किनगाव रोडलगत असलेल्या शिवसम्राट सोयाबीन बिर्याणी दुकानाजवळ फायरिंगची रिकामी पुंगळी आढळून आली. त्यानंतर परिसरातील दुकानदार व नागरिकांकडे विचारपूस करण्यात आली.

गोळीबारानंतर निर्माण झाला तणाव
घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी रिकामी पुंगळी तसेच इतर महत्त्वाचे भौतिक पुरावे ताब्यात घेतले. भर चौकात गोळीबार झाल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी यावल पोलिसात हवालदार हितेश बागुल यांच्या फिर्यादीवरून आर्म अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मैनोद्यीन सैय्यद करीत आहे.

व्हिडिओ काढल्याच्या रागातून गोळीबार?
कोळन्हावी फाट्यावर सोळुंके यांचे हॉटेल असून तेथे बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याचा आरोप असून याबाबतचा व्हिडिओ काही तरुणांनी काढला होता. त्याचा राग मानून सोळुंके याने गुरुवारी रात्री डांभूर्णीतील चौकात बिर्याणी दुकानाजवळ हवेत गोळीबार करीत दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी घेतली धाव
फायरिंग केल्यानंतर आरोपी विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके हा जळगावकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन व पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन पाटील यांना आरोपीच्या शोधासाठी जळगावी रवाना करण्यात आले. दरम्यान, यावल पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व त्यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम तडवी, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चवरे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन घुगे यांनीही संयुक्त शोध मोहीम राबवत आरोपीला रात्री उशिरा जळगावच्या कालिका माता मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

दोघांविरोधात गुन्हा
पोलीस कर्मचारी हितेश अरुण बागुल यांच्या फिर्यादीवरून कोळन्हावी सरपंच विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके व गावठी कट्टा विक्री करणारा संशयीत रोशन भीमराव सपकाळे (30, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !