तिरुपती-नगरसोल विशेष एक्स्प्रेसमध्ये अनोळखी प्रवाशाने घेतला गळफास

हातावर तेलुगू भाषेत ‘आर’ची खूण : ओळख पटविण्याचे मनमाड पोलिसांचे आवाहन


मनमाड (सोमवार, 31 ऑगस्ट 2026) : तिरुपती-नगरसोल विशेष एक्स्प्रेसच्या मागील जनरल डब्यात एका अनोळखी पुरुषाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी मनमाड पोलिसांकडून नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण ?
मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, 24 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 3.50 वाजता ट्रेन क्रमांक 07427 तिरुपती-नगरसोल विशेष एक्स्प्रेसच्या मागील जनरल कोचमध्ये एक अनोळखी पुरुष गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. रेल्वे स्थानकावरील संबंधित अधिकार्‍यांनी याबाबत पोलिसांना लेखी मेमोद्वारे माहिती दिली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 50 वर्षे, उंची सुमारे 170 सेंटीमीटर असून रंग निमगोरा आहे. त्याचे उजळे-पांढरे केस असून त्याने पांढरा शर्ट आणि गडद रंगाची पँट परिधान केली होती.

मृत व्यक्तीच्या हातावर तेलुगू भाषेतील ‘आर’ अक्षर कोरलेले असल्याचे आढळून आले आहे. ही विशिष्ट खूण त्याची ओळख पटविण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. घटनेची माहिती मिळताच पीएसआय संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले तर मृताची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांकडून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.

नागरिकांना आवाहन
उजळे-पांढरे केस, अंदाजे 50 वर्षे वय, सुमारे 170 सेंटीमीटर उंची, पांढरा शर्ट, गडद रंगाची पँट आणि हातावर तेलुगू भाषेतील ‘आर’ अक्षराची खूण असलेली व्यक्ती आपल्या परिचयाची किंवा नातेवाईकांची व्यक्ती बेपत्ता असल्यास त्यांनी तातडीने मनमाड लोहमार्ग उपनिरीक्षक संजय पाटील (98236-11310) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !