सशक्त राष्ट्रासाठी विद्यार्थ्यांवर संस्कारक्षम शिक्षणाची गरज : भुसावळात महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज

नवअहिर सुवर्णकार समाज मंडळातर्फे समाजातील गुणवंतांचा गौरव


भुसावळ (मंगळवार, 31 ऑगस्ट 2026) : कुटुंब व्यवस्था, धर्म, संस्कृती आणि समाज व्यवस्था सशक्त राहण्यासाठी सर्व पालकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. मुलांना संत नरहरी महाराज यांचे चरित्र समजावून सांगा व व्यवहार आणि परमार्थ साध्य करण्यासाठी मुलांवर चांगले संस्कार होणे गरजेचे असून सशक्त राष्ट्रासाठी संस्कारक्षम शिक्षणाची गरज असल्याचे विचार येथे महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी येथे व्यक्त केले. शहरातील नवअहिर सुवर्णकार समाज मंडळातर्फे व्यंकटेश बालाजी मंदिरात रविवार, 30 रोजी आयोजित श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जन्मोत्सवानिमित्त समाजातील गुणवंतांच्या गौरव सोहळ्याच्या प्रसंगी त्यांनी आशीर्वचन दिले.

मुलांवर संस्कारक्षम विचार रूजवा
महामंडलेश्वर जनार्दन महाराज म्हणाले की, समाजाला संघटीत राहून संस्कारक्षम शिक्षण देण्याची गरज असून गरीब विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारून त्यांना शिक्षणाचे साहित्य भेट दिल्यास वंचित मुलेही शिक्षणाच्या प्रवाहात येतील. पालकांनी मोबाईलला अवास्तव महत्त्व न देता विद्यार्थ्यांशी बोलावे, असे विचारही महाराजांनी मांडले.

यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर समाजाचे अध्यक्ष गणेश दुसाणे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, ह.भ.प.गायत्री दुसाणे, महिला मंडळाच्या उपाध्यक्षा ज्योती भामरे व्यासपीठावर उपस्थित होत्या.

सशक्त भारत घडवा : रजनी सावकारे
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या की, समाजातील महिलांनी एकत्र येऊन मुलं आणि कुटुंब ही जबाबदारी सांभाळताना सशक्त भारत घडवावा.

समाज कल्याणासाठी एकत्र या
ह.भ.प.गायत्री दुसाणे यांनी श्री संत नरहरी महाराज यांचे व्यक्तिमत्त्वाचे चरित्र स्पष्ट करून सांगितले. सुवर्णकार समाजाच्या कल्याणासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

सामाजिक भवन निर्मितीसाठी सहकार्याचे आवाहन
गणेश दुसाणे यांनी समाजात मंडळाकडून वर्षभर केल्या जाणार्‍या कार्यक्रमांची माहिती देत सामाजिक भवनाच्या निर्मितीसाठी सर्व समाज बांधवांनी सोबत येऊन मदत करावी. असे आवाहन केले.

गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप
प्रसंगी दहावी, बारावी, पदविका (डिप्लोमा), पदवी, पदव्युत्तर, मेडिकल परीक्षेत यश संपादन करणार्‍या समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. प्रकाश विसपुते यांनी गत वर्षाचा हिशोब सादर केला .
भुसावळ शहरात सुवर्णकार समाज मंडळाची स्थापना करणारे आणि आतापर्यंत अध्यक्ष पद भूषवणार्‍या सर्व माजी अध्यक्षांचा सहृदय सत्कार महामंडलेश्वरांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी असलेल्या सुवर्णकार समाजातील स्वातंत्र्यवीरांचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून त्यांच्या वारसांना कुटुंबीयांना सन्मानित करण्यात आले. उल्लेखनीय काम करणार्‍या पोलीस बांधवांचाही सन्मान झाला. एमपीएससी परीक्षेत उत्तम यश व गुणवत्ता प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

यांचे उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम
नारायण घोडके यांनी सूत्रसंचालन तर प्रवीण मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन व सत्कार प्रा.डॉ.श्यामकुमार दुसाणे, सुनील सोनगिरे, राजेंद्र पारोळेकर यांनी केले. कमलेश निकुंभ यांनी अन्नदानासाठी देणगी देणार्‍या देणगीदारांचे यादी वाचन केले. समाजबांधवांसह गुणवंत पाल्यांची उपस्थिती. यशस्वीतेसाठी अध्यक्ष गणेश दुसाणे, उपाध्यक्ष मोहन लिलानाथशेठ सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र दत्तात्रयशेठ सोनार, सचिव नारायण पुंडलिकशेठ घोडके, सहसचिव प्रा.डॉ.श्यामकुमार मधुकरशेठ दुसाणे, कोषाध्यक्ष प्रकाश रामदासशेठ विसपुते, कार्यकारिणी सदस्य- संतोष अशोकशेठ सोनार, विश्वनाथ दौलतशेठ सोनार, प्रशांत गणपतीशेठ सोनार, अनिलदत्त मधुकरशेठ सोनार, मनोज रमेशशेठ सोनार, प्रवीण बाबूलालशेठ मोरे, कमलेश छगनशेठ निकुंभ, संजय मुरलीधरशेठ सोनार, सुनील डिगंबरशेठ सोनगिरे, राजेंद्र ईश्वरशेठ पारोळेकर, हिमांशु संदीप दुसाणे आदींनी परिश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !