यावल शहरात कचरा संकलन ठप्प दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कचरा संकलन पूर्ववत करण्याची विरोधी गटाची निवेदनाव्दारे मागणी ; अन्यथा नगरसेवकांच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा


यावल (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यावल शहरात सुरू असलेले घराघरातील कचरा संकलन गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने शहरातील विविध भागांमध्ये कचर्‍याचे ढीग साचले आहेत. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी तातडीने कार्यवाही करून कचरा संकलन सेवा सुरळीत करण्याची मागणी भाजपाच्या गटनेता नंदा राजेंद्र महाजन यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

तर आंदोलन छेडणार
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत यावल शहरात घराघरातून कचरा संकलन करण्यात येते मात्र गेल्या काही दिवसांपासून ही सेवा बंद असल्यामुळे नागरिकांकडून जमा होणारा कचरा रस्त्याच्या कडेला तसेच परिसरात टाकला जात आहे त्यामुळे अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग तयार झाले आहेत. परिसरात अस्वच्छता पसरल्याने व कचरा साचल्याने दुर्गंधी तसेच डास आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नगरपरिषद प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन घराघरातील कचरा संकलनाची व्यवस्था तातडीने पूर्ववत करावी तसेच रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा उचलून परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शहरातील नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळणे आवश्यक असून, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद आहे. या प्रश्नावर तातडीने योग्य ती कार्यवाही न झाल्यास भाजपच्या नगरसेवकांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही गटनेता नंदा राजेंद्र महाजन यांनी निवेदनाद्वारे दिला. प्रसंगी नगरसेवक बाळु फेगडे, योगेश चौधरी, उमेश फेगडे, कदीर खानसह आदींची उपस्थिती होती.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !