मिरवणुकीत वाजवला कर्कश आवाजात डीजे : चोपड्यात पोलिसांनी दाखल केला गुन्हा

डीजे चालकांच्या गोटात खळबळ : निर्धारीत मर्यादेपेक्षा अधिक आवाजात वाजवला डीजे


चोपडा (सोमवार, 7 सप्टेंबर 2026) : गणेशोत्सव, सण-उत्सव आणि मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण करणार्‍या डीजे चालकांविरोधात चोपडा शहर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजविणार्‍या चालकावर कायदेशीर कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आल्याने डीजे चालकांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण ?
चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवार, 6 सप्टेंबर 2026 रोजी जहारवीर गोगाजी महाराज जन्मोत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीपूर्वी संबंधित मंडळ व आयोजकांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 168 अन्वये नोटीस बजावून ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच मोठ्या क्षमतेच्या डीजे/साउंड सिस्टीमचा वापर न करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

आवाज मर्यादा ओलांडल्याने कारवाई
मिरवणुकीदरम्यान रूपम ज्वेलर्स, चोपडा परिसरात डीजेचा आवाज मोठ्या प्रमाणात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सुरूवातीला समज दिली मात्र त्यानंतरही उपयोग न झाल्याने टेस्टो कंपनीच्या मीटरद्वारे आवाजाची तीव्रता मोजली असता एलईक्यू 115.6, एलएएफ -120.9 डेसीबल व एलएएफ -113 डेसीबल आल्याने पोलिसांनी सचिन उर्फ पिंटू पंडित शिरसाठ विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223, 292, 3 (5), ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम 2000 मधील कलम 3 व 4 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) 3 सह 135 अन्वये कायदेशीर कारवाई केली.

नियमांचे पालन न केल्यास दाखल होणार गुन्हे
धार्मिक, सामाजिक अथवा अन्य कार्यक्रमांसाठी परवानगी घेताना पोलिसांनी दिलेल्या सर्व अटी व सूचनांचे काटेकोर पालन करावे. कर्कश आवाजात अथवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक तीव्रतेने डीजे किंवा साउंड सिस्टीम वाजविल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले व सहकार्‍यांनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !