पाच लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

झुंबा क्लास व जिमवरील कारवाई टाळण्यासाठी सात लाखांची मागणी : दोन लाख आधीच घेतल्याचा आरोप


बारामती (मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : झुंबा डान्स क्लास आणि जिमविरोधातील तक्रारीवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना बारामती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बारामती शहरातील माळेगाव रोड परिसरात करण्यात आली. महेश उगले असे कारवाईत पकडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी
तक्रारदार आणि त्यांच्या पत्नी बारामती येथे संयुक्तपणे झुंबा डान्स क्लास व जिमचा व्यवसाय चालवतात. या व्यवसायामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या तक्रारीचा आधार घेत संबंधित व्यवसायावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदार महेश उगले याने लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

सात लाखांची मागणी ; दोन लाख घेतल्याचा आरोप
एसीबीकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, संबंधित झुंबा क्लास आणि जिमवर कारवाई न करण्यासाठी हवालदार उगले याने सुरुवातीला सात लाख रुपयांची लाच मागितल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी दोन लाख रुपये यापूर्वीच स्वीकारल्याचा आरोप आहे. उर्वरित पाच लाख रुपयांसाठी तगादा लावण्यात येत असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले.

पाच लाखांची रोख रक्कम स्वीकारताच कारवाई
लाचेच्या मागणीबाबत तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने बारामतीतील माळेगाव रोड परिसरात सापळा रचला. पी.डी.सी.सी. बँकेजवळ तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने हवालदार महेश उगले याला रंगेहाथ पकडल्याची माहिती आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !