आदिवासी विभागात सुधर्माची आगळी-वेगळी विजयादशमी
शंभर मुलांसोबत साजरा केला 24 वा वर्धापन दिन
यावल (मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026) : सुधर्मा सामाजिक संस्थेचा 24 वा वर्धापन दिन यंदा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. संस्थेची परंपरा म्हणजे केक न कापता नवीन गावात जाऊन गरजू मुलांना मदत करणे. याच परंपरेनुसार यावल येथील काला डोह आणि धुळे पाडा या दोन शाळांचा एकत्रित कार्यक्रम काला डोह येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
शंभर आदिवासी मुलांना साहित्याचे वाटप
या वेळी दोन्ही शाळांतील सुमारे 100 आदिवासी मुलांना वह्या-पुस्तके, शालेय साहित्य, मिठाई आणि खाऊचे वाटप करण्यात आले. मंथन परीक्षेत यश मिळवलेल्या 15 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वाधिक गुण मिळवणारी वृषाली बारेला हिला रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. गावात निरपेक्षपणे काम करणार्या मगिलाल बारेला, जाड्या बारेला, मालसिंग बारेला, नानसिंग बारेला, भगादा बारेला, मिताली बारेला, कमलाबाई बारेला, संगिता बारेला, आराधना बारेला आणि एमलाबाऊ भिलाला यांचा गीतेची प्रत आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
मुलांनी भविष्यात चांगले नागरिक बनून देशसेवा करावी
सुनीता बेलसरे म्हणाल्या, सुधर्माचे काम तळागाळातील मुलांसाठी आजही सुरू आहे. ज्या मुलांना कोणीच नाही अशा 200 मुलांचे पालकत्व आम्ही स्वीकारले आहे. त्यांना सायकली, शैक्षणिक साहित्य, आरोग्य सुविधा दिल्या जातात. अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणे हाच खरा विजयादशमीचा संदेश आहे. संस्थापक अध्यक्ष हेमंत बेलसरे म्हणाले, सुधर्मा हा वंचित मुलांचा आधारवड असून या मुलांनी भविष्यात चांगले नागरिक बनून देशसेवा करावी.
यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
यशस्वीसाठी सूर्यकांत हिवरकर, नितीन तायडे, रोशनी ननवरे, भाग्यश्री ननवरे, नानाभाऊ चव्हाण, सुनीता बेलसरे, अरुण बेलसरे, दिनकर बाविस्कर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास ज्योती जाधव, हमीद तडवी, सुरंग बारेला आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी शाळेच्या वतीने श्रीकांत मोठे यांनी आभार मानले.
