किनगाव खुर्द शेत शिवारात अज्ञात माथेफिरूने कापली 500 केळी झाडे
यावल (मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील किनगाव खुर्द या गावाच्या शेत शिवारात दोन शेतकर्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान करण्यात आले. यात शेत गट क्रमांक 255 मध्ये 500 केळीचे झाडे कापून फेकली तर शेत गट क्रमांक 229 मध्ये पाईपलाईन फोडून नुकसान केले आणि शेतात असलेले तूर पिक देखील कापून शेतकर्यांचे नुकसान केले आहे. .या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले किनगावात ?
किनगाव खुर्द या गावातील शेतकरी महेश जोगी तसेच यांचे किनगाव खुर्द शिवारात मालोद रस्त्यावर शेत गट क्रमांक 229 आहे. या शेतात कोणीतरी अज्ञात इसमाने प्रवेश करून तेथील तुर पीक कापून फेकले तसेच पाईपलाईन फोडून फेकली यात शेतकर्याचे 5 हजाराचे नुकसान झाले आहे. किनगाव बुद्रुक गावातील रहिवासी महेंद्र पाटील या शेतकर्याच्या मालोद रस्त्यावरील किनगाव खुर्द शेत शिवारातील गट क्रमांक 255 मध्ये नवतीच्या केळीचे तब्बल 500 झाडे कापून फेकून दिली यात शेतकर्याचे तब्बल 20 हजारांचे नुकसान झाले.
दोन्ही ठिकाणी शेतात अज्ञात माथेफिरूने 25 हजारांचे नुकसान केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात महेश जोगी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.
