बोरावलजवळ झाड कोसळल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प
यावल नगराध्यक्षांच्या सतर्कतेने वेळीच मदतकार्य : वाहन चालकांनी मानले आभार
यावल(शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : जळगावहून यावल येथे परतत असताना बोरावल गावाजवळ अचानक आलेल्या जोरदार वार्यासह पावसामुळे रस्त्यावर भले मोठे झाड कोसळल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुमारे एक तास वाहतूक बंद राहिल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली.
यावेळी यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया अतुल पाटील व नगरसेवक अतुल पाटील हे त्या मार्गावरून जात असताना त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न
नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच अतुल पाटील यांनी बोरावल येथील मित्र शांताराम धनगर, उमेश पाटील व अमोल राणा यांना तातडीने घटनास्थळी बोलावून घेतले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, नगराध्यक्षा छाया पाटील यांनी यावल नगरपरिषदेच्या कर्मचार्यांशी संपर्क साधून रेस्क्यू व्हॅन व जेसीबी तातडीने घटनास्थळी पाठविण्याच्या सूचना दिल्या.
नगरपरिषदेचे कर्मचारी व जेसीबी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर छाया पाटील यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून आवश्यक सूचना दिल्या. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर कोसळलेले भलेमोठे झाड बाजूला करण्यात आले आणि काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली. बोरावल येथील नागरिक तसेच वाहनचालक व प्रवाशांनी नगराध्यक्षांच्या तत्परतेचे कौतुक करत आभार मानले.

