पावसाची विश्रांती संपणार? 15 सप्टेंबरपासून राज्यात कमबॅक !

राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट ; शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता


मुंबई (शनिवार, 12 सप्टेंबर 2026) : गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे चिंतेत असलेल्या राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी हवामान विभागाने दिलासादायक अंदाज वर्तविला आहे. राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, पुढील काही दिवसांत अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः 15 सप्टेंबरपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास अद्याप नाही
राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. 12 ते 14 सप्टेंबरदरम्यान अनेक भागांत पावसाची शक्यता असून, त्यानंतर 15 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक यांसह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

12 सप्टेंबरला या जिल्ह्यांना इशारा
12 सप्टेंबर रोजी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

13 सप्टेंबरला पावसाचा विस्तार
13 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

14 सप्टेंबरला घाटमाथ्यावर विशेष लक्ष
14 सप्टेंबर रोजी नाशिक आणि पुणे जिल्ह्यांतील घाटमाथा, अहिल्यानगर तसेच रत्नागिरी या भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

खरीप पिकांना मिळू शकते संजीवनी
पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने अनेक भागांत खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची चिंता शेतकर्‍यांमध्ये होती. आता अपेक्षेप्रमाणे पाऊस झाल्यास माना टाकलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. तसेच जलसाठ्यांमध्ये वाढ झाल्यास आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात हलका होऊ शकतो.

विजांच्या कडकडाटात नागरिकांनी काळजी घ्यावी
पावसासोबत काही भागांत विजांचा कडकडाट आणि वादळी वारे होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली, मोकळ्या मैदानात किंवा विद्युत खांबांच्या जवळ थांबणे टाळावे, तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

सैटेलाइट नकाशातून मान्सूनची स्थिती
सैटेलाइट नकाशातून राज्यासह देशातील मान्सूनच्या ढगांची स्थिती आणि पावसाच्या प्रणालीचा अंदाज घेता येतो. आगामी काही दिवसांत महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण कायम राहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाच्या पुढील अपडेटकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !