भुसावळातील विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक ‘बाप्पा’
प्रतिष्ठा महिला मंडळ, रोटरी क्लब भुसावळ रेलसिटी, इनरव्हील क्लबचा संयुक्त उपक्रम ; 850 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
भुसावळ (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : गणेशोत्सव म्हणजे उत्साह, श्रद्धा आणि आनंदाचा सण मात्र या उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून पर्यावरणपूरक ‘बाप्पा’ साकारण्यात आला. प्रतिष्ठा महिला मंडळ, भुसावळ, दैनिक दिव्य मराठी, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी आणि सोनिच्छा ड्रॉइंग क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू मातीपासून गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन गुरुवार, 10 सप्टेंबर रोजी शहरातील मातृभूमी चौकातील संतोषीमाता हॉलमध्ये करण्यात आले. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भेट देत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला व उपक्रमाचे कौतुक केले.
जलप्रदूषण टाळण्याचा संदेश
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी शाडूमातीच्या गणेशमूर्तींचा वापर वाढावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन
रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचे अध्यक्ष सुयश न्याती, सचिव डॉ. राहुल पांडे यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही कार्यशाळेला आवर्जून भेट देत विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीचे कौतुक केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले.
850 विद्यार्थ्यांचा सहभाग
खिरोदा आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य अतुल वानखेडे यांनी प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देत मार्गदर्शन केले. तब्बल 850 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेतून आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या.
उत्कृष्ट मूर्तींना पारितोषिके
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मूर्तींपैकी उत्कृष्ट कलाकृतींची निवड करून प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. रोटरी क्लबच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र तसेच खाऊचे वाटप करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही प्रभावीपणे पोहोचला.
मुस्लिम मुलींचा सहभाग ठरला विशेष आकर्षण
या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले ते मुस्लिम समाजातील दोन मुलींचे गणेशमूर्ती निर्मितीतील योगदान. त्यांनी उत्साहाने शाडू मातीपासून सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. त्यांच्या कलाकृतींचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या सहभागातून धार्मिक सलोखा, सर्व धर्म समभाव आणि सामाजिक एकोप्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
पालकांचाही पर्यावरणपूरक संकल्प
कार्यशाळा पूर्णतः विनामूल्य आयोजित करण्यात आली होती. अनेक पालकांनी आपल्या मुलांनी तयार केलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्तीचीच यंदा घरी स्थापना करण्याचा संकल्प व्यक्त केला त्यामुळे ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव – प्रत्येकाच्या सहभागातून’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून घराघरांत पोहोचण्यास मदत होणार आहे.
यांनी पटकावला क्रमांक
सहभागी स्पर्धकातून प्रथम तीन क्रमांकाची निवड करण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक प्रतीक बाविस्कर व प्रेम बाविस्कर (कुर्हेपानाचे) यांनी तर द्वितीय पार्थ भावसार (भुसावळ), तृतीय वैष्णवी शिंधियासे (भुसावळ) व उत्तेजनार्थ- आदित्य पवार (भुसावळ) अधिरा रानडे (भुसावळ), मोहित येवले (किन्ही), शर्वरी महाजन (भुसावळ), कितिका सैतवाल (भुसावळ). विशेष पुरस्कार- इराया अमित बागवान आणि आयशा अमित बागवान (भुसावळ) यांना देण्यात आला.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जयश्री चौधरी, अनिता अंबेकर, सोनल महाजन, वैशाली सैतवाल, राजश्री बादशाह, हिमाली फालक, ज्योती राणे, योगीता वायकोळे, कविता पाचपांडे, डॉ.जान्हवी पाटील यांनी विशेष सहकार्य केले. या उपक्रमाचे पालक, विद्यार्थी आणि नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

