लाचखोर पोलीस हवालदाराला तीन वर्षांची शिक्षा

दहा हजारांच्या लाच प्रकरणात एसीबीने केली होती अटक


नाशिक (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : लाचखोरीच्या प्रकरणात नाशिक तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार रामचंद्र राजाराम आडके यांना न्यायालयाने विविध कलमान्वये दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी चार महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

असे आहे लाच प्रकरण
लाचखोर हवालदार आडके यांनी तक्रारदार व त्यांच्या चुलत भावाच्या विरुद्ध नाशिक तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती 10 हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले होते. या प्रकरणी 24 सप्टेंबर 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. चौकशीदरम्यान आडके यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत लाच स्वीकारली व या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास पूर्ण करून प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.एल. मोरे, कोर्ट क्र. 4, नाशिक यांनी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सचिन गोरवाडकर यांनी कामकाज पाहिले.

या कारवाईत पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेराठे, अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास शिवाजी लोंढे, पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे, हवालदार प्रभाकर गवळी, हवालदार किरण धुळे आदींनी काम पाहिले.

लाचखोरांविरोधात निसंकोच करा तक्रार
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचार्‍याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी 1064 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सूचितही केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !