मराठा आरक्षणावर मंत्री गिरीश महाजनांचा जरांगेंना सल्ला ; ‘कायद्याच्या चौकटीत राहून चर्चेतून तोडगा काढा’


जालना (शनिवार, 12 सप्टेंबर 2026) : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाची तीव्रता वाढत असताना अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देत सरकारशी चर्चा करून कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले आहे.

‘14 पैकी 12 मागण्या सरकारने मान्य केल्या’
गिरीश महाजन यांनी सांगितले की, सरकारच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांची अनेक वेळा भेट घेतली आहे. त्यांच्या एकूण 14 मागण्यांपैकी 12 मागण्या सरकारने सनदशीर प्रक्रियेतून मान्य केल्याचा दावा त्यांनी केला. मराठा समाजाला आरक्षणासह शैक्षणिक सवलती आणि विविध योजनांचा लाभ देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र न्यायालयाच्या आदेशांच्या मर्यादा लक्षात न घेता काही मागण्या पूर्ण करणे शक्य नसल्याचे महाजन यांनी नमूद केले. ‘सगेसोयरे’ तसेच जात पडताळणी समिती रद्द करण्यासारख्या मागण्यांवर कायदेशीर अडचणी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘शिवीगाळ करून प्रश्न सुटणार नाही’
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्यांवरही महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना जाहीरपणे शिवीगाळ केल्याने आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. आंदोलकांनी कायद्याच्या चौकटीत राहून चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढावा, असे त्यांनी म्हटले. जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहनही महाजन यांनी केले.

संजय राऊतांच्या टीकेवर महाजनांचा पलटवार
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या टीकेवरही गिरीश महाजन यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. राऊत यांच्या वक्तव्यांवर फार गांभीर्याने प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत महाजन यांनी त्यांच्या वक्तव्यांवर टीका केली. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणतेही विधान करण्याची त्यांची जुनी पद्धत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पेपरफुटीप्रकरणी सरकार अपयशी नसल्याचा दावा
पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना महाजन यांनी सरकारचा बचाव केला. काही व्यक्तींनी पैशांच्या हव्यासापोटी गैरप्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला असून, संबंधितांवर पोलिसांनी कारवाई केल्याचे सांगितले.

परीक्षेचे प्रश्नपत्रिका छपाईपासून वितरणापर्यंत अनेक टप्प्यांतून जात असल्याने या प्रक्रियेत गैरप्रकाराची शक्यता निर्माण होते. पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कठोर कायदे केले असल्याचे महाजन यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचा संताप स्वाभाविक असल्याचे मान्य करत त्यांनी सांगितले की, विद्यार्थी मोठ्या मेहनतीने परीक्षेची तयारी करतात. मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. मात्र, या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा काही जण प्रयत्न करू शकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सावध राहावे, असा इशाराही त्यांनी दिला.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !