भुसावळ रेल्वे विभागात स्वच्छतेसह जनजागृती उपक्रमांचे आयोजन


भुसावळ (बुधवार, 23 सप्टेंबर 2026) : भुसावळ विभागात ‘स्वच्छता ही सेवा (एसएचएस) 2026’ अभियान 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. यावर्षीच्या अभियानाची संकल्पना स्वच्छतेमध्ये सहभागिता, स्वच्छ भारत, विकसीत भारत अशी आहे.

विविध रेल्वे स्थानकांवर स्वच्छता मोहिम
या अनुषंगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानके, रेल्वे वसाहती तसेच रेल्वे कार्यालयांमध्ये स्वच्छ स्थानक, स्वच्छ रेल्वेगाडी आणि स्वच्छ भारत या उपक्रमांतर्गत विविध स्वच्छता, जनजागृती व पाहणी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. 22 सप्टेंबर 2026 रोजी विद्युत लोको शेड, भुसावळ येथे ‘स्वच्छता ही सेवा अभियान-2026’ अंतर्गत सफाई कर्मचारी, वरिष्ठ मंडळ अभियंता, मंडळ अभियंता तसेच अतिरिक्त मंडळ अभियंता यांच्या सहभागाने स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीद्वारे शेड परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवणे, उघड्यावर कचरा टाकू नये तसेच कचरा केवळ निर्धारित कचरापेटीतच टाकावा, असा संदेश देण्यात आला. यावेळी कर्मचार्‍यांना स्वच्छतेबाबत जागरूक व जबाबदार राहण्यासाठी प्रेरित करण्यात आले.

भुसावळ विभागातील सर्व प्रमुख तसेच इतर रेल्वे स्थानके, रेल्वे वसाहती आणि कार्यालयांमध्येही विविध स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रमुख स्थानकांवर सफाई कर्मचार्‍यांसाठी स्वच्छता यंत्रे, आवश्यक साधने व उपकरणे तसेच वैयक्तिक सुरक्षा साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून ती कार्यरत स्थितीत असल्याची खात्री करण्यात आली.

इतर स्थानकांवर विशेष स्वच्छता मोहीम, ओला व सुका कचरा यासाठी स्वतंत्र कचरापेट्यांची व्यवस्था, कचरापेटीचा योग्य वापर करण्याबाबत जनजागृती तसेच प्लास्टिकमुक्त फलाट अभियान यासारखे विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून रेल्वे कर्मचारी तसेच प्रवाशांना स्वच्छता अंगीकारणे, कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत जागरूक करण्यात आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !