यावल ठाण्यातील कर्मचार्याच्या मृत्यूपश्चात कुटुंबीयास एक कोटींच्या विमा धनादेशाचे वितरण
यावल (बुधवार, 23 सप्टेंबर 2026) : यावल पोलीस ठाण्यातील कर्मचारी भरत कोळी यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांचे पगार खाते हे यावलच्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत होते व पगार खात्याचा त्यांचा एक कोटीचा विमा होता. त्यांच्या मृत्यू पश्चात बँकेकडून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंगळवारी त्यांच्या कुटुंबीयास पोलीस ठाण्यात बोलावून एक कोटींचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
किनगाव गावातून यावल येणार्या रस्त्यावर अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर हॉटेल मन मंदिराच्या समोरून 9 एप्रिल 2026 रोजी रात्री भरत विठ्ठल कोळी (38) हे यावलचे पोलीस कर्मचारी मोटरसायकल (क्रमांक एम.एच.19 सी.जी. 2813) द्वारे विदगाव येथून किनगावमार्गे यावल येत असताना भरधाव वेगात मागून क्रुझर चारचाकी वाहन (क्रमांक एम. एच. 29 बी.सी. 5487) वरील चालक दीपक प्रकाश सपकाळे (रा.आडगाव) ने भरधाव वेगात मागुन दुचाकीस जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार भरत कोळी गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचाराकरिता जळगावी नेण्यात आले व खाजगी रुग्णालयात 20 एप्रिल 2026 रोजी सोमवारी पहाटेपूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
मयत कोळी यांचे पगार बँक खाते हे यावल येथील भारतीय स्टेट बँक शाखेत असून या पगार खात्यास विमा होता. यावल शाखेकडून संपुर्ण कायदेशिर प्रक्रिया पार पाडल्यानंतर मंगळवारी येथील पोलीसस ठाण्यात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, हवालदार वासुदेव मराठे यांच्या समक्ष कोळी यांच्या कुटुंबीयात यावल शाखा व्यवस्थापक राधेश्याम मुंगमोळे, केशव चौधरी, दिनेश खडसे, श्रेया नाथ इ बँक कर्मचार्यांच्या वतीने एक कोटींचा धनादेश वारसांना प्रदान करण्यात आला.




