भुसावळातील भोळे महाविद्यालयाच्या खेळाडूंना शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
भुसावळ (गुरुवार, 24 सप्टेंबर 2026) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील बॉक्सिंग खेळाडूंनी शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
बॉक्सिंगमध्ये भोळे विद्यालयाचा डंका
जळगाव जिल्हा क्रीडा संकुलात 21 ते 23 सप्टेंबर 2026 दरम्यान शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत 17 वर्षांखालील 48-50 किलो वजन गटात प्रथमेश सुरज उमरे, 63-66 वजन गटात कपिलेश विनोद जेठवे तसेच 19 वर्षांखालील 75-80 वजन गटात सुमित विजय निराळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

या यशामागे तिचा नियमित सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि मेहनत यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. मिळविलेल्या या यशामुळे तिची आगामी विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी नाशिकसाठी निवड झाली. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागप्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी त्यांचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हास्तरीय सुवर्णपदकानंतर आता नाशिक येथील विभागीय शालेय स्पर्धेतही बॉक्सिंग खेळाडू यांनी उत्तम कामगिरी करून महाविद्यालयाचे व भुसावळचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. खेळाडूंना प्रा.डॉ.संजय चौधरी, बॉक्सिंग प्रशिक्षक अनिल सपकाळे व पवन शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.



